Saturday 3 November 2018

‘महाराष्ट्र दिनमान’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन

 नामवंत कवींची बहारदार काव्यमैफिलही

ठाणे । प्र्रतिनिधी
साहित्यातील विविध प्रवाहांची दखल घेतानाच कालानुरुप घडामोडींचेही प्रतिबिंब कथासाहित्यातून उमटवणारा महाराष्ट्र दिनमानचा पहिला दिवाळी अंक शनिवार, 3 नोव्हेंबर, 2018 रोजी गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर प्रकाशित होणार आहे.उद्योग क्षेत्रातील आघाडीचे नाव रमण खुराणा, अध्यक्ष ग्लोबल पंजाबी असोसिएशन, उपाध्यक्ष इंडियन मर्चंट्स चेंबर, नवी मुंबई चॅप्टर, कलागुणांची पाठराखण करणार्‍या अपूर्वा प्रॉडक्शनचे अध्यक्ष सुमुख वर्तक, वृत्तपत्रांचे जुनेजाणते ज्येष्ठ वितरक अरविंद दातार, डॉ. अनंत देशमुख आणि कविवर्य आप्पा ठाकूर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, भगवान निळे, मंगेश विश्वासराव व देवीदास सोनावणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनमान दिवाळी अंकाचा हा प्रकाशन सोहळा दुपारी साडे चार वाजता होत आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत गझलकार आप्पा ठाकूर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, भगवान निळे, मंगेश विश्वासराव व देवीदास सोनावणे अशा रसिकप्रिय कवीश्रेष्ठांची एक बहारदार काव्यमैफिलही रंगणार आहे. कर्जत ते मुंबई आणि पनवेल ते पालघर परिसरातील रसिक वाचक या सोहळ्यासाठी अगत्याने उपस्थित राहाणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
महाराष्ट्र दिनमानच्या दिवाळी अंकात यंदा साहित्य फराळावर भर देण्यात आला आहे. इतिहास ते वर्तमान काळाशी सुसंगत लेख, रुपेरी पडद्याचा रंगीत प्रवास, जपानला प्रेरणा देणारी कवयित्री असे विविध लेख या अंकात आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नव्या दमाच्या कथाकारांच्या आशयगर्भ कथा, सोशल मीडियाचे दुष्परिणाम दर्शवणार्‍या कथा, कविता, व्यंगचित्रे अशा वाचनीय साहित्याने अंक परिपूर्ण आहे. वाचकांचे दिवाळी बजेट बिघडू नये याची काळजी घेत अवघ्या 70 रुपयांत हा अंक ठाणे, मुंबईसह सर्वत्र रविवारपासून उपलब्ध होणार आहे.याच वेळी दै. जनादेश आणि रणांगण या दिवाळी अंकांचेही प्रकाशन होणार आहे. सर्व रसिक वाचकांना या प्रकाशन सोहळ्यासाठी अगत्याचे निमंत्रण आहे.

वसईचे जीवघेणे पाणी!


वसई-विरार शहरासाठी पाणी हा विषय नेहमीच ज्वलंत राहिला आहे. शहराचा विकास (?) झपाट्याने झाला तरी शहर आजही पाणीटंचाईला तोंड देत आहे. 2009मध्ये महापालिका अस्तित्वात आली. पण तिलाही या समस्येवर मात्रा सापडलेली नाही. आता सूर्या प्रकल्प योजनेचा तिसरा टप्पा दृष्टिक्षेपात आहे. सूर्या, उसगाव, पेल्हार या धरणांतून अमुक इतके पाणी शहराला मिळेल, असे आश्वासन पालिका देत असली तरी जनता पाणी हंड्यात मोजते. हे पाणी जेव्हा खर्‍या अर्थाने हंड्यात येईल... तेव्हाच ही समस्या सुटली म्हणायची. ( 20 एप्रिल 2016 च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीच्या हवाल्यानुसार महापालिकेने जूनपर्यंत नागरी भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन दिले होते.)पण अद्याप या जलवाहिन्या आलेल्या नाहीत. त्या येण्याआधी निवडणुका येतील... त्या जिंकायच्या म्हणजे हेच पाणी सत्ताधारी पेट्रोलसारखे पेटवतील आणि त्यावर निवडून येतील. तोपर्यंत या शहराला टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे. आणि तोपर्यंत टँकर आणि पाणी येथील नागरिकांचे जीव घेतच राहणार आहेत.
वसई-विरार शहरातील कित्येक भाग आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. ग्लोबलसिटीसारखी आलिशान वसाहतही आपली तहान टँकरच्या पाण्यावरच भागवते आहे. वसई पूर्व, नालासोपारा पूर्व, विरार पूर्व आणि अन्य काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा होताना दिसतो. बेकायदा बांधकामांनी नैसर्गिक जलस्रोतांचा घोटलेला गळा, बेकायदा इमारतींसाठी होत असलेला बेफाम पाणीउपसा आणि जागोजागी मारल्या गेलेल्या बोअरवेल ही कारणे पाणीटंचाईसाठी कारणीभूत असली तरी वसई-विरार महापालिकेचे नसलेले नियोजन आणि त्यामागे असलेले राजकारणही या पाणीटंचाईला कारणीभूत आहे.
साहजिकच दिवसभर शहरातील अनेक रस्त्यांवर टँकर धावताना दिसतात. या टँकरनी रस्त्यांची वाट तर लावली आहेच, पण आता भरवस्तीतून धावणारे हे टँकर नागरिकांचाही जीव घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी वसईत एका तरुणाचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. परिणामी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. गणेशोत्सवादरम्यान गणेश आगमनादिवशीच नालासोपार्‍यातही मिरवणुकीदरम्यान, एका व्यक्तीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या वेळीही मिरवणुकीत सहभागी लोकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला होता. या लोकांना हटवण्यासाठी मग पोलिसी बळाचा वापर केला गेला, पण टँकरविरोधी कारवाईसाठी कोणतीही पावले उचलली गेलेली दिसली नाहीत.
त्या आधी परदेशातून विरार येथील ग्लोबलसिटी येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेली तरुणी स्कुटीवरून जात असताना तिला टँकरने धडक दिली होती. या अपघातात या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यापूर्वीही एका चिमुरड्याला नालासोपारा येथे एका टँकरने चिरडले होते. तर चंदनसार येथे एका दुचाकीला टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या झाल्या या वर्षातील अलीकडच्या घटना... पण वर्षानुवर्षे या शहराला असलेली टँकरची साडेसाती आजही संपलेली नाही. अशा अनेक घटना या आधीही घडल्या आहेत. दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री वर्दळीच्या आणि भररस्त्यांतून, तर कधी चिंचोळ्या रस्त्यांवरून धावणारे टँकर राक्षसांसारखे वाटतात. शाळांतून सुटलेल्या विद्यार्थ्यांचे, रस्ता ओलांडणार्या पादचार्यांचे, तर कधी अबालवृद्धांना आपल्या जबड्यात घेतील की काय? असे भयाण आवाज करत धावतात. दुर्दैव म्हणजे अशा घटना घडत असताना कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यातील कित्येक टँकर हे मोडीत व भंगारात निघालेले आहेत.पण ना त्यांच्याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष, ना आरटीओचे!
मागील काही वर्षांत वसई-विरारची लोकसंख्या झपाट्याने वाढली. वसई-विरार शहराच्या 383 किलोमीटरच्या परिसरात आजघडीला तब्बल 13 लाख लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येत दिवसागणीक वाढच होत आहे. परिणामी महाराष्ट्रातील पाचवे मोठे शहर म्हणूनही वसई-विरार शहर उदयास येत आहे. त्या तुलनेत वसई-विरार महापालिका या शहराला मूलभूत सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे.
वसई-विरार शहराचा तथाकथित विकास (?) झाला तरी अद्याप हे शहर पाणीटंचाईला तोंड देत आहे. शहरात झालेली बेफाम अनधिकृत बांधकामे आजही पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेतच, पण अधिकृत म्हणवल्या जाणार्या इमारतीही याच पाण्याच्या घोटावर जीवन ढकलत आहेत. काही इमारती अनधिकृत असल्याने त्यांना अद्याप महापालिकेकडून पाण्याची कनेक्शन मिळालेली नाहीत. याचाच परिणाम जागोजागी पाणी विक्री करणारी दुकाने वाढली. बेकायदा पाणी विकण्याचा धंदा वाढला. काही इमारती कायमच टँकरवरच अवलंबून राहिल्या. ही वाढती पाणीटंचाई टँकर लॉबी आणि पाणी विक्रेत्यांच्या पथ्यावरच पडली. उन्हाळ्यात तर ही लॉबी चढ्या किमतीने पाणी विक्री करून नागरिकांची लूट करते. विशेष म्हणजे महापालिकेकडू होणारा पाणीपुरवठा काही भागात जास्त, तर काही भागांत कमी होत असल्याने ज्या ठिकाणी पाणी येते, त्या नळांवर झुंबड उडालेली दिसते. या जीवघेण्या कसरतीत लोकच पाण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठताना दिसतात. 30 जून 2015 रोजी टँकरच्या पाण्यावरून वालीव येथे दोन गट एकमेकांना भिडले होते. यातील सात जणांना पोलिसांनी अटकही केली होती.(संदर्भ : फ्री प्रेस जर्नल)वालीव येथील औद्योगिक परिसरात अफाट बेकायदा बांधकामे झालेली आहेत. ही सर्व बांधकामे टँकरवरच पाण्यासाठी अवलंबून असलेली दिसतात. परिणामी या ठिकाणी हाणामारीच्या घटना रोजच होत असतात. महिलांचा तर दिवस पाणी भरण्यात आणि पाण्याची वाट पाहण्यातच जातो.
दुसरीकडे महापालिका टँकर लॉबीवर नियंत्रण मिळवण्यातही अपयशी ठरली आहे. टँकरमधून येणारे पाणी नेमके येते कुठून? याचाही कुणाला ठावठिकाणा घ्यावासा वाटत नाही. दोन वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही टँकर जवळपासच्याच खदानींतून पाणी भरताना दिसले होते. तर काही टँकर महापालिकेचीच जलवाहिनी फोडून पाणी भरताना आढळले होते. त्यानंतरही महापालिकेने याविरोधात कडक कारवाई केलेली दिसली नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने आवाज उठवलेला दिसला नाही.कारण या पाण्यात सगळ्यांचेच हात ओले होत असल्याने आणि नागरिकांचाही तहानेने गळा सुकल्याने असा आवाज उठणे शक्यच नव्हते. तर महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने आपले कान बंद करून घेतल्याने आवाज उठला तरी त्यांच्यापर्यंत तो गेलाच नसता. याचाच अर्थ वसई-विरारचे टँकर आणि पाणी भविष्यातही अनेक जणांचे प्राण घेणार हे नक्की आहे.

दिवाळी आणि दिवाळे

काही वर्षांपासून आपल्याकडे ऑनलाईन शॉपिंगचा जणू चस्का लागल्यासारखे झाले आहे. कुठूनही कुठेही घरबसल्या खरेदी आणि वस्तू जगाच्या पाठीवर घरपोच ही तर या सुविधेची सर्वाधिक आकर्षणाची बाब. भारतातील गाव, तालुके, शहरे, महानगरे सर्वत्रच हे वेड झपाट्याने फोफावत गेले आणि तितक्याच वेगाने पारंपरिक पद्धतीने व्यवसाय, विक्री, उद्योग करणार्‍या आपल्या अवतीभवतीच्या दुकानदारांचा व्यवसाय कमी होत गेला. ही स्पर्धा आता तर विषम झाली आहे. मोठमोठ्या ब्रँड्सची दुकाने आहेत पण लोक हेच ब्रँड वेबसाईटवरून सवलतीत खरेदी करतात आणि चकचकीत शोरूम ग्राहकांची वाट पाहात राहातात. बंपर सेल, दिवाळी स्पेशल, इंडियाज मूड अशा विविध कॅची टॅगलाईनखाली सध्या ई-कॉमर्स क्षेत्राने आपला व्यवसाय वाढवला आहे. या आकर्षक सवलतींच्या मार्‍याला ग्राहकही बळी पडतात. ब्रॅण्डेड वस्तू कमी किंमतीत मिळत असल्याने या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर तुफान गर्दी होते. याचा फटका मात्र स्थानिक आणि छोट्या व्यापार्‍यांना बसला आहे. घरबसल्या शॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात दुकानांमध्ये म्हणावी तशी गर्दी अद्याप दिसलेली नाही. छोटे मोठे दुकानदार, स्टॉलधारक यांच्या व्यवसायावरच जणू कुर्हाड आली आहे. आजघडीला देशात सुमारे सात कोटींहून अधिक किरकोळ व्यापारी आहेत. यापैकी बहुतांश व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू विकतात. तर एक मोठा टक्का हा इलेक्ट्रॉनिक आणि कापड क्षेत्राशी संबंधित आहे. या व्यापार्यांच्या दृष्टीने रक्षाबंधन ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा आणि तेथून पुढे उन्हाळ्यातील लग्नसराईचा मोसम व्यापारासाठी अनुकूल समजला जातो. पण, ऑनलाइन कंपन्यांनी त्यांचा धंदा बारा महिन्यांसाठी खाल्ला आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर एक संदेश प्रचंड व्हायरल झाला होता. विदेशी कंपन्यांकडून खरेदी करून भारतातला पैसा परदेशी पाठवण्यापेक्षा स्थानिक व्यापार्‍यांकडूनच खरेदी करण्याचं आवाहन या संदेशात होते. मात्र तरीही ऑनलाईन शॉपिंगचा पगडा कमी झालेला नाही. हल्ली कपड्यांपासून ते अगदी घरातील वाणसामानापर्यंत सारंकाही एका क्लिकवर घरपोच होते, तेही तुलनेने कमी किंमतीत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट काढत, घाम पुसत, गर्दीत धक्के खात खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या असा ऑनलाईन शॉपिंगचा पर्यायच निवडला जातो. मात्र हा ट्रेंड काही पारंपरिक व्यवसाय करणार्या व्यापार्यांच्याच मुळावरच आला आहे. ऐन दिवाळीत त्यांची दिवाळं निघण्याची वेळ आली आहे. सणांच्या काळात करोडोंची उलाढाल करणार्या उल्हासनगरातील व्यापारीही डोक्याला हात लावून बसले आहेत. रस्त्यांवर पसरलेला शुकशुकाट डिजिटल क्रांतीची जाणीव करून देत असला तरीही ही क्रांती मात्र लहान व्यापारांसाठी दिवाळी नव्हे दिवाळं काढणारी ठरली आहे. हाच उरला सुरला व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ येऊ नये याकरता उल्हासनगरातील व्यापारांनी एकत्र येत चाणक्यनिती आखली. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून वस्तू खरेदी करायच्या. खरेदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय वापरायचा. वस्तूची डिलिव्हरी आल्यावर ती डिलिव्हरी नाकारायची. माल सतत परत गेल्याने मग त्या पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय बंद करण्यात येतो. ही शक्कल उल्हासनगरातील अनेक व्यापार्‍यांनी वापरली. परिणामी अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांनी उल्हासनगर पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्यायच बंद केला. कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायामुळेच ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात केले जाते.  हा पर्याय बंद पाडण्याची नामी शक्कल उल्हासनगरातील व्यापार्‍यांनी लढवली खरी पण त्याचबरोबर ग्राहकांच्या अधिकारांवरही त्यांनी आक्रमण केले आहे. ग्राहक त्यांना पाहिजे त्या पर्यायाने, पाहिजे त्या सुविधेनुसार, घरातून, बाजारात जावून खरेदी करू शकतात. त्यांचा ऑनलाईन खरेदीचा पर्याय बंद केला असल्यास या व्यापार्‍यांनी ग्राहकांना खरेदीचे चांगले पर्याय, सवलती, चांगली उत्पादने स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करून द्यायला हवीत. ग्राहकांशी चांगले वागायला हवे. पसंत नसलेला वा खराब, दर्जाहीन निघालेला माल बदलून द्यायला हवा. तरच बाजारपेठा पुन्हा गजबजू शकतात हे दुकानदार, व्यापारी यांनीही ध्यानात घ्यायला हवे. जमाना आता ऑनलाईनचा आहे. ग्राहक राजा आहे. त्याच्याशी अरेरावीची वर्तणूक यापुढे चालणार नाही हे उमजून सर्वच शहरांमधील व्यापारी, दुकानदार वर्गाने त्यांची व्यवहाराची, वागण्याची पद्धतही बदलावी. तरच ग्राहक दुकानांची पायरी कदाचित पुन्हा चढतील. ठाणे, मुंबई व अन्य शहरांतही हीच परिस्थिती आहे. एक विचित्र परिस्थिती या नव्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमुळे एक लाखभर तरुणांना नोकर्या लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तेव्हाच स्थानिक दुकानांमधून कर्मचारी कपात करण्यात आली. हे चित्र बदलायचे असेल तर दुकानदारांनाही त्यांच्या व्यवसायाचा फेरविचार करावा लागणार आहे.

Maharashtra Dinmaan - Marathi Diwali Ank 2018

MaharashtraDinman Marathi Newspaper Publishing From Thane 03 Novembar 2018, Page 1

MaharashtraDinman Marathi Newspaper Publishing From Thane 03 Novembar 2018, Page 1

MaharashtraDinman Marathi Newspaper Publishing From Thane 03 Novembar 2018, Page 2

MaharashtraDinman Marathi Newspaper Publishing From Thane 03 Novembar 2018, Page 2

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...