Maharashtra Dinman Marathi Newspaper Publishing From Thane
Friday, 24 November 2017
अग्रलेख/ एका न्यायाधिशाचा मृत्यू.. महाराष्ट्र दिनमान २४ नोव्हेंबर २०१७
एका न्यायाधिशाचा
मृत्यू
सोहराबुद्दीन शेख
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडून नोव्हेंबर, २००५ मध्ये चकमकीत मारला
गेला होता. पोलिसांनी शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना हैदराबादेतून उचलून आणले
आणि कथित चकमकीत शेखला गांधीनगरजवळ मारले. त्याची पत्नीही तेव्हापासून ‘नाहिशी’ झाली आहे. या सगळ्या
घटनाक्रमाचा साक्षीदार आणि शेखचा मदतनीस प्रजापती यालाही २००६ मध्ये गुजरातच्याच
बनासकांटा जिल्ह्यातील छाप्री गावात पोलिसांनीच उडवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण जर
आठवत असेल तर याच प्रकरणात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे गृहमंत्री
गुलाबचंद कटारिया, गुजरातचे तत्कालीन पोलीस महासंचालक पी.सी. पांडे, अतिरिक्त
महासंचालक गीता जोहरी आणि पोलीस अधिकारी अभय चुडासामा व एन.के. अमीन, डी.जी.
वंजारा आदींना न्यायालयाने आरोपी म्हणून गेल्याच महिन्यात दोषमुक्त केले आहे हेही
अनेकांच्या लक्षात असेल. लक्षात नसेल तर तो न्या. ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू.
याच लोया यांच्यासमोर सीबीआय न्यायालयात सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाची आधी सुनावणी
सुरू होती. तेव्हा अमित शहा या खटल्यातील आरोपींपैकी एक होते. ३१ ऑक्टोबरच्या
सुनावणीत अनुपस्थितीबद्दल शहा यांना समज देऊन न्या. लोया यांनी १५ डिसेंबर, २०१४
ही सुनावणीची पुढची तारीख दिली होती. नंतर सहकारी न्यायधीशांच्या मुलीच्या
लग्नासोहळ्यासाठी नागपूरला गेलेल्या लोया यांचा तिथेच १ डिसेंबर, २०१४ च्या रात्री
मृत्यू झाला. त्या वेळी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या लोया यांच्या मृत्यूचे
कारण हृदयविकाराचा झटका असे सांगतात. जो माणूस रोज दोन तास टेबल टेनिस खेळायचा,
फिट होता, त्यांच्या घरातील सर्व माणसे दीर्घायुषी आहेत, ज्याने पत्नीशी रात्रीच
सुमारे चाळीस मिनिटे दूरध्वनीवरून संभाषण केले आहे तो अचानक मरण पावला. ‘कॅरव्हान’ मासिकाचे प्रतिनिधी
आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लोया कुटुंबीयांशी बोलून जो काही स्पेशल
रिपोर्ट लिहिला आहे तो वाचल्यावर लोया यांचा मृत्यू संशयास्पद वाटायला लागतो.
सोहराबुद्दीन चकमक खटला ज्याच्यासमोर सुरू आहे, ज्या खटल्यात अमित शहा आणि
गुजरातचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपी आहेत असा न्यायाधीश अचानक मरण पावतो
आणि त्याच्या कुटुंबीयांना या मृत्यूविषयी जे काही उलटसुलट सांगितले गेले आहे ते
टकले यांच्या लेखात वाचताना मनात संभ्रमाचे वादळ उठते. एनडीटीव्हीचे पत्रकार रवीश
कुमार यांनी तर हे सर्व वाचताना अंगावर एक थंडगार शहारा उमटतो, तुम्ही स्वत:लाही असहाय आणि निशस्त्र समजू लागाल, असे म्हटले
आहे. तीन वर्षे लोया यांच्या बहिणी आणि कुटुंबीय या प्रकरणी तोंड मिटून होते. पण टकलेंना
लोया यांची भाची पुण्यात भेटली आणि या कुटुंबाने तीन वर्ष सहन केलेली घुसमट, अनेक
अनुत्तरीत प्रश्न आता समोर आले आहेत. लोया सिव्हील लाईन्स परिसरातील रेस्ट हाऊसला
उतरले होते. त्यांच्या सोबत दोन अन्य न्यायाधीशही होते. अशा वेळी त्यांना
हृदयविकाराचा झटका आल्यावर एका अतिशय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, तेही
रिक्षातून. सिव्हील लाईन्सला रात्री रिक्षा मिळणे अशक्य असताना रिक्षा मिळाली
कुठून? त्यांच्या सोबतचे न्यायाधीश सहकारी कुठे होते? त्यांच्या मृत्यूची पोलिसांनी नोंदवलेली वेळ
वेगळी, रुग्णालयातील वेगळी आणि फोनवरून कुटुंबाला कळवलेली वेळ वेगळी. सीबीआयचे
न्यायमूर्ती असलेल्या लोया यांचे पार्थीव एका रुग्णवाहिकेतून फक्त चालकासोबत
पाठवून देण्यात आले. सोबत अन्य कुणीही नाही. वर कुणाला काही बोलू नका असे एक
न्यायाधीश या कुटुंबाला वारंवार बजावत होते. लोया यांचे पार्थीव येईतो राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे नागपूरचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते या बहिणींशी संपर्क साधतात.
त्यांना लोया कसे माहिती?
लोया यांच्या मृत्यूची बातमी त्यांना कुणी
सांगितली? या प्रश्नांची उत्तरे आजही लोया यांच्या बहिणीला
मिळालेली नाहीत. रवीश कुमार म्हणतात, टाकळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट भयचकीत करणारा
आहे. लोया यांचा मृत्यू त्यावेळी सर्वांनी एक सर्वसाधारण मृत्यू म्हणून स्वीकारला
होता. आता निरंजन टाकळेंमुळे तीन वर्षांनी लोया यांच्या निधनाशी संबंधित अनेक बाबी
आणि अनुत्तरित प्रश्न उघड झाले आहेत. शवचिकीत्सा अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने
मृत्यू अशी नोंद असलेल्या लोयांच्या शर्टावर, मानेमागून रक्ताचे पाठीपर्यंत डाग
आणि डोक्यात जखम असल्याचे बहिणीने तिच्या डायरीत नोंदवले आहे, असे टकले या लेखात
लिहितात. २९ नोव्हेंबर रोजी सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी पुढील सुनावणी सुरू होणार
आहे. हे प्रकरण हाताळणाऱ्या एका न्यायाधिशाच्या मृत्यूबाबत स्पष्ट उत्तरे मिळण्याची हीच योग्य वेळ आहे.
(अधिक
माहितीसाठी - http://www.caravanmagazine.in/vantage/shocking-details-emerge-in-death-of-judge-presiding-over-sohrabuddin-trial-family-breaks-silence)
Subscribe to:
Posts (Atom)
भले तर देऊ कासेची लंगोटी
भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...
-
Download Todays Pages
-
epaper lokmat,sakal marathi news paper,divya marathi epaper,epaper pudhari,epaper punyanagari,divya marathi jalgaon,divya marathi news ...