Showing posts with label Edit. Show all posts
Showing posts with label Edit. Show all posts

Tuesday, 30 January 2018

अग्रलेख.. धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?

अग्रलेख
धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?
धर्मा पाटील नावाच्या धुळे जिल्ह्यातील कुणा शेतकऱ्याने रविवारी रात्री जेजे रुग्णालयात अखेर प्राण सोडले. काय फरक पडतो आणखी एक शेतकरी देवाघरी गेला तरी? हा सगळा स्टंटच होता असा खुलासा अद्याप तरी आलेला नाही पण येऊ शकतो. शासकीय यंत्रणांनी त्यांची जमीन कवडीमोलाची नुकसानभरपाई देऊन हिरावून घेऊन खरे तर आधीच धर्मा पाटील यांचे प्राण हिरावून घेतले होते. जमीन म्हणजे शेतकऱ्यासाठी प्राणच असतो. चांगली लागती जमीन, आमराई असलेल्या या जमीनीसाठी धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये देण्यात आले होते. त्यांच्याच गावातील आणि परिसरातीलच ७५ गुंठे जमीनीला ७५ लाख रुपये भाव मिळाला होता. एकाच गावातील जमीन, एकाच प्रकल्पासाठी घेतलेली, घेणारे सरकार, महावितरण एकच पण धर्मा पाटील यांची चक्क फसवणूक झाली होती. जेव्हा ती लक्षात आली तेव्हा धर्मा पाटील यांच्या मंत्रालयात आणि महावितरणच्या दारात चकरा सुरू झाल्या. ऊर्जा मंत्र्यांचे दरवाजे त्यांनी अनेकदा खटखटवले. पण असे अनेक म्हातारेकोतारे मंत्रालयाच्या पायऱ्या चढता चढता चपला झिजवतात, त्यातलाच हा एक म्हातारा. त्याची फसवणूक करणारी यंत्रणा बलाढ्य होती, सरकार नामक दमन यंत्रणा होती. फसवणूक केल्याचे कुणीच मान्य करीना, नुकसानभरपाई देखील वाढवून मिळेना यामुळे आलेल्या आत्यंतिक नैराश्यापोटी धर्मा पाटील खचले होते. अखेर या म्हाताऱ्याने विषाचा प्याला तोंडाला लावला. मंत्रालयातच विष प्राशन केले. तरीही सरकार हलले नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येची जेव्हा बातमी झाली तेव्हा यंत्रणेला जाग आली. प्रकरण कुणाच्याच अंगावर शेकू नये म्हणून थातूरमातूर खुलासे झाले. धर्मा पाटील यांना १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे निर्लज्जपणे सांगण्यात आले. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. असे असले तरी त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला भरपाई कमी मिळाल्याचे धर्मा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हा वृद्ध शेतकरी लढत होता आणि त्याला खेटे घालायला लावत यंत्रणा त्याची क्रूर थट्टा करत होती. कुणीच ताकास तूर लागू देईना. याचा निषेध म्हणून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केले. धर्मा पाटील यांची ही कहाणी सध्या राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची आहे. भूसंपादन, तुटपुंजी नुकसानभरपाई, अधिकाऱ्यांकडून फसवणूक, दडपशाही, कर्जमाफीसाठी अविरत प्रतीक्षा अशा विविध आघाड्यांवर नाडला जाणारा शेतकरी कडेलोटाकडे ढकलला गेला आहे. तीव्र नैराश्याच्या गर्तेत भोवंडणारा हा गरीब जीव फासावर लटकवून घेत आहे. धर्मा पाटील यांची जमीन लाटली गेली पण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच तत्कालीन आमदार व एका विद्यमान मंत्र्याने प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करून, राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतली होती. धर्मा पाटील यांना मात्र विष प्राशन करावे लागले. त्यांच्यासारखेच अनेक नाडलेले, नागवले गेलेले गरीब न्यायाच्या आशेने दररोज मंत्रालयाच्या गेटवर घुटमळत असतात, चुकून आत प्रवेश मिळालाच तर इथूनतिथून धावत राहातात, लिफ्टने जायला बिचकणारे हे सर्वसामान्य जिने चढता-उतरताना थकून जातात, कुठेतरी कँटीनचा कोपरा धरून भाकरी खातात, फायलींमधले जीर्ण कागद यालात्याला मोठ्या आशेने दाखवत राहातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधुनिक, प्रगतशील महाराष्ट्रातील रयतेचे राजेच आहेत. याआधी होऊन गेलेल्या रयतेच्या राजाने गोरगरीबांच्या गवताची काडीही इकडची तिकडे करायची नाही म्हणून मावळ्यांना बजावून ठेवले होते. फडणवीससाहेब, मंत्रालयातील तुमच्या फौजेने आणि यंत्रणांमधील लुटारूंनी रयतेची अवस्था दयनीय केली आहे. त्यांना तुम्ही महाराजांप्रमाणेच धाकात ठेवायला हवे. विरोधी पक्षात असताना सामान्यांचा विश्वास तुम्ही कमावला होता. आणि आता त्यांनाच नागवणाऱ्या यंत्रणेचे तुम्ही कर्तेधर्ते म्हणून तो विश्वास तुम्ही गमावला आहे. तुम्हालाही धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा नव्हे हत्येचाच बट्टा लागला आहे. सरकारच्या उरलेल्या कालावधीत हा बट्टा पुसून काढणे हाच एककलमी कार्यक्रम राबवून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केलात तरी पुष्कळ झाले.
Who Killed Dharma Patil... Killers are in Mantralaya

Thursday, 14 December 2017

लिहून देतो कर्जमाफी झाली आहे.., EDIT, Maharashtra Dinman, Farmers Karjmafi, CM, Assembly. Irrigaiton scam, Ajit Pawar

अग्रलेख
लिहून देतो कर्जमाफी झाली आहे..

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात ऐतिहासिक कर्जमाफी झाली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १०० रुपयांच्या नव्हे तर हजार रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून द्यायला तयार असताना काही नतद्रष्ट मंडळी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. फडणवीस यांनी सभागृहातही तेच सांगितले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याकडे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर ज्यांची कर्जमाफी झाली त्यांची नावे लिहून द्या, अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनीही आक्रमकपणे शंभर काय हजाराच्या स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असे आव्हान दिले. तरीही विश्वास दाखवायचा नाही म्हणजे कायहजाराची नोट तर मोदीसाहेबांनी कॅन्सल केली ना बे, मंग हजाराचा स्टॅम्पपेपर कुटून आणणारै भाऊ.. असेही अविश्वासू नतद्रष्ट मंडळींपैकी कुणीतरी पुटपुटल्याचं कानावर आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रामाणिकपणे कामाला लागलेले आणि बँकांना, आयटी खात्याला व सहकारी मंत्र्यांना कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरही ते आले असणार. पण त्यांनी विचलित होऊ नये. काही लाख शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करायचे, कर्जमाफी करायची, खचलेल्या बळीराजाला पुन्हा त्याच्या पायावर उभे करायचे, हिंमत द्यायची, त्यासाठी हेलिकॉप्टर डगमगले तरी स्वत: न डगमगता अविश्रांत दौरे करायचे, प्रत्येक ठिकाणी कर्जमाफीची माहिती द्यायची, आकडेवारी सांगायची हे येरागबाळ्याचे काम नोहे. आणि हे काम करत असताना जाहिराती देऊन केलेल्या कामाचे पुरावे जनतेसमोर सादर करायचे याला कुणी जाहिरातबाजी म्हणत असेल तर अशी माणसे करंटीच म्हणावी लागतील. सभागृहात खुद्द मुख्यमंत्री कर्जमाफी झाली आहे सांगतात तरी राज्याच्या या नेत्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही याला म्हणावे तरी काय? बुधवारी पुन्हा अजितदादांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. ३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही. जे उत्तर आहे ते इथे द्या”, अशी विचारणा त्यांनी फडणवीस यांना केली. आता या मंडळींना मामु फडणवीस यांनी सैराटमधील आर्चीचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवण्याची वेळ आली आहे. तोच तो मराठीत सांगितलेलं कळत नाही का.. डायलॉग. फडणवीस साहेब ऐकवाच या मंडळींना तुम्ही तो डायलॉग नाहीतर कर्जमाफी झाल्याबद्दल मंगळवारी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली  अशी जी जिल्हावार पत्रके सटासट प्रसार माध्यमांकडे पोहोचती झाली ती तरी त्यांच्या तोंडावर मारा. मगच, कर्जमाफीच्या वाटपाबाबत सरकारमध्येच एकवाक्यता नाही. सुभाष देशमुख एक सांगतात, चंद्रकांत पाटील दुसरंच बोलतात मुख्यमंत्री वेगळीच कोणतीतरी घोषणा करतात’, असे बोलणाऱ्या अजितदादांची बोलती बंद होईल. अद्याप शेतकऱ्य़ांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय’, असा आरोप करायला अजितदादा धजावतात तरी कसे? ज्या शेतकऱ्यांनी सरकारला कर्जमाफीबद्दल धन्यवाद दिल्याचे निवेदन केलेय ते दादांनी बहुदा वाचलेलं दिसत नाही. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री कर्जमाफीची आकडेवारी देताना परस्पर विरोधी माहिती देतात, असे दादा म्हणत असले तर त्यांना सिंचन घोटाळ्यातील आकडेवारीचीही आठवण करून द्यायला हवी. काही लाख कोटींची ही कर्जमाफी आहे. तपशील देताना चारपाचशे कोटी इकडेतिकडे होऊ शकतात. जनता हे समजून घेऊ शकते पण, राजकीय स्वार्थाने आंधळी झालेली विरोधी पक्षांतील नेतेमंडळी फडणवीस यांचा हे प्रामाणिक प्रयत्न समजून घेत नाहीत याचे वैषम्य कर्जमाफीबद्दल भाजपा सरकारला धन्यवाद देणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना वाटते आहे. कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे हे दिसत असतानाही नागपूरच्या थंडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळावर मोर्चा आणला. शरद पवारसाहेबांसारख्या जाणत्या राजाने सरकारशी असहकार करण्याची भाषा केली. धमक्या दिल्यात तर सरकार उलथवून टाकू... कर्जमाफी होईतो शेतकऱ्यांनी एकही वीज बील भरू नये, कर्जही फेडू नये असेही सांगितले. हा जनआक्रोश महामोर्चा विधानभवनाकडे सरकत असतानाच सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाले हा निव्वळ योगायोग आहे. ही धमकी किंवा ब्लॅकमेलींग नाही हे कुणीही सांगेल. आघाडी सरकारच्या काळातील कुणा मंत्र्यावर गुन्हा दाखल झाला असता तर एकवेळ ते सुडाचे राजकारण वा धमकीचे राजकारण म्हणता आले असते. कर्जमाफीवरून वारंवार सरकारला सतावले जाते, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते म्हणून गुन्हे दाखल करून गर्भीत इशारा दिला, असेही नाही. कर्जमाफीबाबत सरकारला काहीही लपवायचे नाही की विरोधकांचा आवाजही बंद करायचा नाही हे अवघा महाराष्ट्र जाणतो.

Wednesday, 13 December 2017

भाजपाचे पाकिस्तान कार्ड, Edit, BJP, Pakistan, PM, Modi, Gujrat Elections

अग्रलेख
भाजपाचे पाकिस्तान कार्ड
काही आठवड्यांपूर्वी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुचित आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तेव्हा पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा करणाऱ्या लालूंच्या या प्रतापबद्दल याच संपादकीय स्तंभातून निषेध व्यक्त केला होता. मोदींसारखा नेता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्त्व करत असतो, पंतप्रधानपदाची एक शान असते, दर्जा असतो, सन्मान असतो. त्याचा असा अवमान खपवून घेऊ नये आणि कुणी अवमान करूही नये, असे याच स्तंभातून लिहिले होते. पण आता खुद्द मोदी यांनीच पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा चालवली आहे. गुजरातच्या निवडणुकीत येन केन प्रकारेन सत्ता राखण्यासाठी मोदींनी तोंडाचा तोफखाना बेबंदपणे सोडला आहे. गुजरातसारख्या छोट्या राज्यातील विधानसभा निवडणूक, त्यात ते मोदींचे होमपीच आणि भाजपाचे बलस्थान समजले जाणारे राज्य तिथे पायाखालची वाळू घसरत असल्याचा अंदाज मोदींसारख्या निष्णात राजनीतीज्ञाला आला असावा असे म्हणायला वाव आहे. त्याशिवाय विकासाची भाषा करणारे, बलशाली भारत आमच्यामुळेच झाला अशी शेखी मिरवणारे, उठसूठ भारतमातेचा गौरव करणारे मोदी एकदम एका राज्याच्या निवडणुकीत पाकिस्तानला खेचणार नाहीत. गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे यासारखे हास्यास्पद विधान आणखी कुठले नसावे. पण मोदींनी ते केले आणि इतकेच नव्हे तर दिल्लीत भारत आणि पाकिस्तानचे जे माजी राजनीतीज्ञ एका खासगी बैठकीत भेटले त्यांनी गुजरात निवडणुकीसाठी कट केला आहे, त्यामुळेच पाकिस्तानने अहमद पटेल यांना पाठिंबा दिला आहे, भाजपा विरोधात पाकिस्तानच्या हालचाली सुरू आहेत, असा तोंडाचा पट्टाही सोडला. गुजरातचा विकास आम्ही केला म्हणणारे भाजपा नेते आणि खुद्द मोदी या महान विकासकार्याचा हवाला न देता आता पाकिस्तानची भीती तिथल्या मतदारांना दाखवू लागले आहेत. गुजरातमधील प्रचारासाठी तळ ठोकून बसलेले भाजपाच्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वा अन्य नेत्यांनी अशी काहीबाही विधाने केली असती, बाष्कळ, निराधार वक्तव्ये केली असती तर एकवेळ ते समजू शकते. पण येथे खुद्द पंतप्रधान पदावरील व्यक्तीने ही विधाने केली आहेत. जे पाकिस्तानच्या नेत्यांशी बोलतात ते देशद्रोही आणि उठसूठ भारतमातेचे नाव घेणारे, विकासचालीसा वाचणारे आम्हीच काय ते देशप्रेमी अशी ही उथळ विभागणी आहे. रोजीरोटी, जीएसटी, नोटबंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, महागाई अशा समस्यांमुळे चवताळलेल्या जनतेचे भावनेला हात घालून ध्रुवीकरण करायचे असेल तर ही उथळ भाषा कामी येते, पाकिस्तानचे नाव घेतले की लोक स्वत:च्या ताटात काही नाही ते विसरून क्षणात देशप्रेमाच्या लाटेखाली गारद होतात हे मोदी आणि भाजपा चांगलेच जाणतात. मोदींना काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना भेटायला आक्षेप आहे पण जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कळसाला होता, उरी आणि पठाणकोटचा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा कुणीही न बोलावता पाकिस्तानला विमान उतरवून मोदी केक खायला नवाज शरीफ यांच्याकडे गेले होते त्याचा बहुदा भाजपाला सोयीस्कर विसर पडला आहे. आजवर दिलेल्या अनेक आश्वासनांप्रमाणेच मोदीही ही बाब कदाचित विसरून गेले असावेत. जगातील एका मोठ्या लोकशाहीचे नेतृत्त्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद अधोरेखित कऱण्याऐवजी संकुचित राजकीय स्वार्थासाठी आपल्याच जनतेला पाकिस्तानची भीती दाखवावी हे निषेधार्ह आहे. जसजशा सार्वत्रिक निवडणुका जवळ येतील तसतसे भाजपा कुठले पत्ते बाहेर काढू शकते याची ही एक झलक आहे. मोदींच्या तोंडफाट वक्तव्यापुढे आपल्या संयमी आणि परिपक्व वर्तनाने प्रभाव पाडणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी याच संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत कधी नव्हे ती कठोर भाषा वापरत मोदींची झाडाझडती घेतली आहे. प्रत्येक घटनात्मक पदाचा अवमान करण्याची ही सवय मोदींनी सोडून द्यावी आणि त्यांच्या पदाला साजेशी परिपक्वता आचरणात दाखवावी. पंतप्रधानपदाचा असा प्रतिष्ठाभंग केल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे डॉ. सिंग यांनी सुनावले आहे. निवडणुकीत पायाखालची वाळू घसरायला लागली की पाकिस्तानची जपमाळ ओढली जाते. मागेही बिहार निवडणुकीत अमित शहा यांनी पाकिस्तानचे नाव वापरलेच होते. तरीही भाजपाचा पराभवच झाला. शहा यांच्याच जय नावाच्या इतिहासाबद्दल भाजपा आता चकार अक्षर काढत नाही, असे शिवसेनेनेही दुत्कारले आहे. अर्थात पाकिस्तानचे नाव घेतल्यामुळे मोदींचे काम झाले आहे. गुजरातमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भलतीकडेच भरकटवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण ते म्हणतात त्याचप्रमाणे अशी जुमलेबाजी जनता फार दिवस खपवून घेत नसते हेही लक्षात घ्यायला हवे.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...