Showing posts with label BJP. Show all posts
Showing posts with label BJP. Show all posts

Tuesday, 19 December 2017

भाजपासाठी धोक्याची घंटा, अग्रलेख, महाराष्ट्र दिनमान, Gujrat election results, BJP, Rahul Gandhi, Modi, Page 4

अग्रलेख
भाजपासाठी धोक्याची घंटा
गुजरातमध्ये भाजपाने सत्तासूत्रे ताब्यात ठेवली आहेत. पण २०१२ भाजपाचा परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. विकासाचे ढोल आणि गर्वी गुजरातच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाला गुजरात तो आपणांच छे... असा आत्मविश्वास वाटत होता. अमित शहा यांनी तर गुजरातमध्ये दीडशेहून अधिक जागांवर भाजपाचा विजय नक्की, असा आत्मविश्वास वेळोवेळी व्यक्त केला होता. राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर ही सगळी तर लिंबुटिंबू गँग. यांची मोदी, शहांसमोर काय मातब्बरी असा प्रारंभी भाजपाचा समज झाला होता. जेव्हा प्रचार पेटला, धमासान सुरू झाली तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असल्याची जाणीव हळूहळू भाजपाला व्हायला लागली. मग गुजरातसारख्या होम पीचवरील निवडणुकीसाठी खुद्द मोदींना गुजरातमध्येच तळ ठोकण्याची वेळ आली. राजकारणात भाजपा करील ते सर्व काही क्षम्य या गर्वापोटी चारित्र्यहनन, कुचेष्टा, हेटाळणी, सोशल मीडियावरील अपमान, विकास सोडून बाकी सर्व वांझोट्या चर्चा, रेटून खोटे दावे, खोटे आरोप सारी हत्यारे भाजपाने बाहेर काढली आणि राहुल, हार्दिक यांच्यासाठी प्रामुख्याने मनमुराद वापरलीही. यामुळे गुजरातच्या रणधुमाळीत सेक्स सीडी आली, राहुल गांधी यांचे देवदर्शन आले, त्यांचा धर्म कुठला याबद्दलही चर्चा झाली, काँग्रेसमध्ये कशी घराणेशाही आहे यावरही टीका करून झाली, मणिशंकर अय्यर यांनी वापरलेल्या शब्दामुळे मला कशा वेदना झाल्या म्हणत अश्रूपातही झाला. पण या अश्रूंची अपेक्षित फळे अर्थात मते काही भाजपाच्या पदरात पडलेली दिसत नाहीत. दीडशे जागांवर विजय सोडा पण होत्या त्या जागाही भाजपाने गमावल्या आहेत. भाजपाच्या जागांचा आकडा कमी झाला, मतांची टक्केवारीही कमी झाली आणि ज्याला पप्पू म्हणून यथेच्छ हिणवले जात होते, कलका बच्चा म्हणून सदोदीत अपमानित केले जात होते, त्याच राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या जागा मात्र गुजरातमध्ये वाढल्या आहेत. गुजरातमधील जागा वाढल्यामुळे राहुल नेतृत्त्वाची एक कठीण परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आणि  २२ वर्षे जिथे एकहाती सत्ता राबवली तिथे जेमतेम सत्ता राखण्याइतके बळ मिळावे अशी भाजपाची दुर्दशा झाली आहे. गुजरातमध्ये सुमारे ८ कोटी मतदार आहेत. त्यापैकी दोन कोटी तर भाजपाचे सदस्य आहेत. तरीही अपेक्षित मते भाजपाला का मिळू नयेत याचा विचार करण्याची सुवर्णसंधी गुजरातच्या निकालाने भाजपाला दिली आहे. अमित शहा यांनी मात्र मते वाढल्याचा दावा केला आहे. मते वाढली आणि जागा मात्र कमी झाल्या असे हे अजब तर्कट आता भाजपाला लढवावे लागत आहे. प्रचाराची पातळी घसरली होती, काँग्रेसने जातीयवादी प्रचार केला असा आरोपही त्यांनी केला आहे. शहा यांनी केलेले हे आरोप भाजपालाही लागू होतात, असे कुणीतरी त्यांना सांगायला हवे आहे. आठ कोटी मतदार आणि जवळपास दोन कोटी भाजपा सदस्य असताना पाच लाख मते नोटा म्हणून नोंदवली जातात हा कौल गेली २२ वर्षे गुजरातमध्ये विकास करणाऱ्या भाजपाविरोधात आहे असेच समजावे लागेल. सहाव्यांदा सत्तेवर येताना भाजपाला गुजरातने दिलेला धडा लक्षात घ्यावा लागेल. नोटबंदी, जीएसटी यामुळे गुजराती व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटेल समाज संतप्त आहे, रोजगार गमावल्यामुळे तरूणाई वैतागली आहे असा गुजरातचा ग्राऊंड रिपोर्ट होता. गुजरात म्हणजे आपलाच.. या अतिआत्मविश्वासाच्या आहारी गेलेल्या भाजपा नेतृत्त्वाने प्रारंभी या गोष्टी दुर्लक्षित केल्या होत्या. अतिआत्मविश्वास एवढा की विकासाचे तुणतुणे वाजवणाऱ्या भाजपाने शेवटपर्यंत गुजरात निवडणुकांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध केला नव्हता. मात्र याच मुद्द्यांवरून राहुल गांधी, हार्दिक पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांनी रान उठवले. भाजपाला खिंडीत पकडायला सुरुवात केली. तेव्हा भाजपाने या मुद्द्यांवरून गुजराती मतदारांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी प्रचाराऐवजी इतर गोष्टींचा अपप्रचार सुरू केला. खुद्द पंतप्रधान पदावरील व्यक्तीने पाकिस्तान कार्ड खेळले. देशाचे माजी पंतप्रधान, माजी लष्करप्रमुख, माजी उपराष्ट्रपती यांच्याविषयी संशयाचे ढग निर्माण केले, निखालास खोटे आरोप केले. धर्माच्या नावावर आणि पाकिस्तानची भीती घालून मतविभागणी होईल अशी पद्धतशीर आखणी केली. इतके करूनही भाजपाची गाडी १०० च्या पुढे जाऊ शकलेली नाही. जनतेने मोदींना मतदान केले आहे, असे म्हणत मोदींचा करिष्म्याला याचे श्रेय दिले जात आहे. भाजपाची घटलेली मते, गमावलेल्या जागा, काँग्रेसची मुसंडी हा मोदींचा करिष्मा असेल तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.


Wednesday, 13 December 2017

भाजपाचे पाकिस्तान कार्ड, Edit, BJP, Pakistan, PM, Modi, Gujrat Elections

अग्रलेख
भाजपाचे पाकिस्तान कार्ड
काही आठवड्यांपूर्वी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुचित आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तेव्हा पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा करणाऱ्या लालूंच्या या प्रतापबद्दल याच संपादकीय स्तंभातून निषेध व्यक्त केला होता. मोदींसारखा नेता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्त्व करत असतो, पंतप्रधानपदाची एक शान असते, दर्जा असतो, सन्मान असतो. त्याचा असा अवमान खपवून घेऊ नये आणि कुणी अवमान करूही नये, असे याच स्तंभातून लिहिले होते. पण आता खुद्द मोदी यांनीच पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा चालवली आहे. गुजरातच्या निवडणुकीत येन केन प्रकारेन सत्ता राखण्यासाठी मोदींनी तोंडाचा तोफखाना बेबंदपणे सोडला आहे. गुजरातसारख्या छोट्या राज्यातील विधानसभा निवडणूक, त्यात ते मोदींचे होमपीच आणि भाजपाचे बलस्थान समजले जाणारे राज्य तिथे पायाखालची वाळू घसरत असल्याचा अंदाज मोदींसारख्या निष्णात राजनीतीज्ञाला आला असावा असे म्हणायला वाव आहे. त्याशिवाय विकासाची भाषा करणारे, बलशाली भारत आमच्यामुळेच झाला अशी शेखी मिरवणारे, उठसूठ भारतमातेचा गौरव करणारे मोदी एकदम एका राज्याच्या निवडणुकीत पाकिस्तानला खेचणार नाहीत. गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे यासारखे हास्यास्पद विधान आणखी कुठले नसावे. पण मोदींनी ते केले आणि इतकेच नव्हे तर दिल्लीत भारत आणि पाकिस्तानचे जे माजी राजनीतीज्ञ एका खासगी बैठकीत भेटले त्यांनी गुजरात निवडणुकीसाठी कट केला आहे, त्यामुळेच पाकिस्तानने अहमद पटेल यांना पाठिंबा दिला आहे, भाजपा विरोधात पाकिस्तानच्या हालचाली सुरू आहेत, असा तोंडाचा पट्टाही सोडला. गुजरातचा विकास आम्ही केला म्हणणारे भाजपा नेते आणि खुद्द मोदी या महान विकासकार्याचा हवाला न देता आता पाकिस्तानची भीती तिथल्या मतदारांना दाखवू लागले आहेत. गुजरातमधील प्रचारासाठी तळ ठोकून बसलेले भाजपाच्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वा अन्य नेत्यांनी अशी काहीबाही विधाने केली असती, बाष्कळ, निराधार वक्तव्ये केली असती तर एकवेळ ते समजू शकते. पण येथे खुद्द पंतप्रधान पदावरील व्यक्तीने ही विधाने केली आहेत. जे पाकिस्तानच्या नेत्यांशी बोलतात ते देशद्रोही आणि उठसूठ भारतमातेचे नाव घेणारे, विकासचालीसा वाचणारे आम्हीच काय ते देशप्रेमी अशी ही उथळ विभागणी आहे. रोजीरोटी, जीएसटी, नोटबंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, महागाई अशा समस्यांमुळे चवताळलेल्या जनतेचे भावनेला हात घालून ध्रुवीकरण करायचे असेल तर ही उथळ भाषा कामी येते, पाकिस्तानचे नाव घेतले की लोक स्वत:च्या ताटात काही नाही ते विसरून क्षणात देशप्रेमाच्या लाटेखाली गारद होतात हे मोदी आणि भाजपा चांगलेच जाणतात. मोदींना काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना भेटायला आक्षेप आहे पण जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कळसाला होता, उरी आणि पठाणकोटचा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा कुणीही न बोलावता पाकिस्तानला विमान उतरवून मोदी केक खायला नवाज शरीफ यांच्याकडे गेले होते त्याचा बहुदा भाजपाला सोयीस्कर विसर पडला आहे. आजवर दिलेल्या अनेक आश्वासनांप्रमाणेच मोदीही ही बाब कदाचित विसरून गेले असावेत. जगातील एका मोठ्या लोकशाहीचे नेतृत्त्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद अधोरेखित कऱण्याऐवजी संकुचित राजकीय स्वार्थासाठी आपल्याच जनतेला पाकिस्तानची भीती दाखवावी हे निषेधार्ह आहे. जसजशा सार्वत्रिक निवडणुका जवळ येतील तसतसे भाजपा कुठले पत्ते बाहेर काढू शकते याची ही एक झलक आहे. मोदींच्या तोंडफाट वक्तव्यापुढे आपल्या संयमी आणि परिपक्व वर्तनाने प्रभाव पाडणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी याच संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत कधी नव्हे ती कठोर भाषा वापरत मोदींची झाडाझडती घेतली आहे. प्रत्येक घटनात्मक पदाचा अवमान करण्याची ही सवय मोदींनी सोडून द्यावी आणि त्यांच्या पदाला साजेशी परिपक्वता आचरणात दाखवावी. पंतप्रधानपदाचा असा प्रतिष्ठाभंग केल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे डॉ. सिंग यांनी सुनावले आहे. निवडणुकीत पायाखालची वाळू घसरायला लागली की पाकिस्तानची जपमाळ ओढली जाते. मागेही बिहार निवडणुकीत अमित शहा यांनी पाकिस्तानचे नाव वापरलेच होते. तरीही भाजपाचा पराभवच झाला. शहा यांच्याच जय नावाच्या इतिहासाबद्दल भाजपा आता चकार अक्षर काढत नाही, असे शिवसेनेनेही दुत्कारले आहे. अर्थात पाकिस्तानचे नाव घेतल्यामुळे मोदींचे काम झाले आहे. गुजरातमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भलतीकडेच भरकटवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण ते म्हणतात त्याचप्रमाणे अशी जुमलेबाजी जनता फार दिवस खपवून घेत नसते हेही लक्षात घ्यायला हवे.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...