Maharashtra Dinman Marathi Newspaper Publishing From Thane
Wednesday, 13 December 2017
भाजपाचे पाकिस्तान कार्ड, Edit, BJP, Pakistan, PM, Modi, Gujrat Elections
अग्रलेख
भाजपाचे पाकिस्तान
कार्ड
काही आठवड्यांपूर्वी
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याविषयी अनुचित आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तेव्हा पंतप्रधानपदाची
अप्रतिष्ठा करणाऱ्या लालूंच्या या प्रतापबद्दल याच संपादकीय स्तंभातून निषेध
व्यक्त केला होता. मोदींसारखा नेता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे
नेतृत्त्व करत असतो, पंतप्रधानपदाची एक शान असते, दर्जा असतो, सन्मान असतो. त्याचा
असा अवमान खपवून घेऊ नये आणि कुणी अवमान करूही नये, असे याच स्तंभातून लिहिले
होते. पण आता खुद्द मोदी यांनीच पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा चालवली आहे. गुजरातच्या
निवडणुकीत येन केन प्रकारेन सत्ता राखण्यासाठी मोदींनी तोंडाचा तोफखाना बेबंदपणे
सोडला आहे. गुजरातसारख्या छोट्या राज्यातील विधानसभा निवडणूक, त्यात ते मोदींचे
होमपीच आणि भाजपाचे बलस्थान समजले जाणारे राज्य तिथे पायाखालची वाळू घसरत असल्याचा
अंदाज मोदींसारख्या निष्णात राजनीतीज्ञाला आला असावा असे म्हणायला वाव आहे.
त्याशिवाय विकासाची भाषा करणारे, बलशाली भारत आमच्यामुळेच झाला अशी शेखी मिरवणारे,
उठसूठ भारतमातेचा गौरव करणारे मोदी एकदम एका राज्याच्या निवडणुकीत पाकिस्तानला
खेचणार नाहीत. गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे यासारखे
हास्यास्पद विधान आणखी कुठले नसावे. पण मोदींनी ते केले आणि इतकेच नव्हे तर
दिल्लीत भारत आणि पाकिस्तानचे जे माजी राजनीतीज्ञ एका खासगी बैठकीत भेटले त्यांनी
गुजरात निवडणुकीसाठी कट केला आहे, त्यामुळेच पाकिस्तानने अहमद पटेल यांना पाठिंबा
दिला आहे, भाजपा विरोधात पाकिस्तानच्या हालचाली सुरू आहेत, असा तोंडाचा पट्टाही
सोडला. गुजरातचा विकास आम्ही केला म्हणणारे भाजपा नेते आणि खुद्द मोदी या महान
विकासकार्याचा हवाला न देता आता पाकिस्तानची भीती तिथल्या मतदारांना दाखवू लागले
आहेत. गुजरातमधील प्रचारासाठी तळ ठोकून बसलेले भाजपाच्या राज्यांचे मुख्यमंत्री,
केंद्रीय मंत्री वा अन्य नेत्यांनी अशी काहीबाही विधाने केली असती, बाष्कळ,
निराधार वक्तव्ये केली असती तर एकवेळ ते समजू शकते. पण येथे खुद्द पंतप्रधान
पदावरील व्यक्तीने ही विधाने केली आहेत. जे पाकिस्तानच्या नेत्यांशी बोलतात ते
देशद्रोही आणि उठसूठ भारतमातेचे नाव घेणारे, विकासचालीसा वाचणारे आम्हीच काय ते
देशप्रेमी अशी ही उथळ विभागणी आहे. रोजीरोटी, जीएसटी, नोटबंदी, बंद पडलेले
उद्योगधंदे, बेरोजगारी, महागाई अशा समस्यांमुळे चवताळलेल्या जनतेचे भावनेला हात
घालून ध्रुवीकरण करायचे असेल तर ही उथळ भाषा कामी येते, पाकिस्तानचे नाव घेतले की
लोक स्वत:च्या ताटात काही नाही ते विसरून क्षणात देशप्रेमाच्या
लाटेखाली गारद होतात हे मोदी आणि भाजपा चांगलेच जाणतात. मोदींना काँग्रेसच्या
नेत्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना भेटायला आक्षेप आहे पण जेव्हा भारत-पाकिस्तान
यांच्यातील तणाव कळसाला होता, उरी आणि पठाणकोटचा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा
कुणीही न बोलावता पाकिस्तानला विमान उतरवून मोदी केक खायला नवाज शरीफ यांच्याकडे
गेले होते त्याचा बहुदा भाजपाला सोयीस्कर विसर पडला आहे. आजवर दिलेल्या अनेक
आश्वासनांप्रमाणेच मोदीही ही बाब कदाचित विसरून गेले असावेत. जगातील एका मोठ्या
लोकशाहीचे नेतृत्त्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भारताची ताकद अधोरेखित
कऱण्याऐवजी संकुचित राजकीय स्वार्थासाठी आपल्याच जनतेला पाकिस्तानची भीती दाखवावी
हे निषेधार्ह आहे. जसजशा सार्वत्रिक निवडणुका जवळ येतील तसतसे भाजपा कुठले पत्ते
बाहेर काढू शकते याची ही एक झलक आहे. मोदींच्या तोंडफाट वक्तव्यापुढे आपल्या संयमी
आणि परिपक्व वर्तनाने प्रभाव पाडणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी याच
संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत कधी नव्हे ती कठोर भाषा वापरत मोदींची झाडाझडती
घेतली आहे. प्रत्येक घटनात्मक पदाचा अवमान करण्याची ही सवय मोदींनी सोडून द्यावी
आणि त्यांच्या पदाला साजेशी परिपक्वता आचरणात दाखवावी. पंतप्रधानपदाचा असा
प्रतिष्ठाभंग केल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी, असे डॉ. सिंग यांनी
सुनावले आहे. “निवडणुकीत पायाखालची वाळू
घसरायला लागली की पाकिस्तानची जपमाळ ओढली जाते. मागेही बिहार निवडणुकीत अमित शहा
यांनी पाकिस्तानचे नाव वापरलेच होते. तरीही भाजपाचा पराभवच झाला. शहा यांच्याच जय
नावाच्या इतिहासाबद्दल भाजपा आता चकार अक्षर काढत नाही”, असे शिवसेनेनेही दुत्कारले आहे. अर्थात पाकिस्तानचे
नाव घेतल्यामुळे मोदींचे काम झाले आहे. गुजरातमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून
लोकांचे लक्ष भलतीकडेच भरकटवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण ते म्हणतात
त्याचप्रमाणे अशी जुमलेबाजी जनता फार दिवस खपवून घेत नसते हेही लक्षात घ्यायला
हवे.
Subscribe to:
Posts (Atom)
भले तर देऊ कासेची लंगोटी
भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...
-
Download Todays Pages
-
epaper lokmat,sakal marathi news paper,divya marathi epaper,epaper pudhari,epaper punyanagari,divya marathi jalgaon,divya marathi news ...