Wednesday, 26 June 2019

जनतेच्या विविध प्रश्नांवर काम करताना

जनतेच्या विविध प्रश्नांवर काम करताना, स्री चळवळीत निलमताई सक्रिय झाल्या आणि स्रियांच्या चळवळीला एक नवा पण हक्काचा जागरुक, कणखर, आक्रमक असा चेहरा मिळाला. यातुनच त्यांच्यातील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आणि त्या राजकारणात आल्या. अड प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर आपल अस्तित्व निर्माण केल. यानंतर त्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात आल्या. काही काळ त्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होत्या पण आपले राजकीय महत्व पुरोगामी समजल्या जाणार्‍या पक्षांना कळत नाही हे जाणून सत्तेतील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून मग नीलमताई  सरळ एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्या आणि त्या शिवसेनेत दाखल झाल्या आणि राजकारणात सक्रिय झाल्या.
अनेक वर्षाच्या शिवसेनेतील सत्तासंघर्षानंतर अखेर महिला चळवळीच्या कार्यकर्त्या, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झालीये. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होणार्‍या त्या दुसर्‍या महिला आहेत. यापूर्वी ऑगस्ट 1955 ते एप्रिल 1962 दरम्यान जे. टी. सिपाही मलानी यांनी हे पद भूषवलं होतं. गेली 35 वर्षं सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या नीलमताईंच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुंबईतल्या आयुर्वेदिक महाविद्यालयातून 1977 साली वैद्यकीय पदवी घेऊन नीलम गोर्‍हेंनी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. दुसरीकडे त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. कुमार सप्तर्षींसारख्या काही तरुणांनी युक्रांदची सुरुवात केली होती. भूमीहिन दलित, ऊसतोडणी कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्ती, त्यांना मिळणारी मजुरी, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचे अधिकार, त्यांचे आरोग्य या समस्यांवरही युक्रांदचं कार्य चालायचं. त्यांच्यासोबत काम करत असतानाच 1987 पासून नीलम गोर्‍हे त्या पूर्णवेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या.
नीलमताईंनी ज्या खुबीने स्त्रियांचे प्रश्न मांडले ते राजकीय काम होतं. काँग्रेसनेही कधी महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे नीलम गोर्‍हेंच्या कामामुळे महिला प्रश्नाला नवं परिमाण मिळालं. त्यातून हा प्रश्न राजकारण्यांच्या अजेंड्यावर आला. शरद पवारांनीदेखील आपल्या राजकारणासाठी याचा फायदा करून घेतला. राजकीय अजेंड्यावर आल्यावरच आपला प्रश्न सुटेल, असं नीलम गोर्‍हेंना वाटलं. त्यादृष्टीने त्या राजकारणात सक्रीय झाल्या. नीलम गोर्‍हेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही रिपब्लिकन पक्षापासून झाली. रिपब्लिकन पक्षासोबत काम करताना त्यांनी महिलांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न यावर अनेक आंदोलनं केली. त्यांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासोबत काम केलं. पुढे त्यांनी काही काळ शरद पवार यांच्यासोबतही काम केलं. कधी डावे पक्ष कधी समाजवादी अशा सर्वांसोबत नीलमताई कधी ना कधी संलग्न राहिल्या आहेत. यातून पुढे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढत गेली. इतकी लढाऊ स्त्री खरंतर कायदेमंडळात जाणं गरजेचं होतं. मात्र, शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला. नीलम गोर्‍हे जे मुद्दे मांडायच्या त्याविषयी राजकारण्यांना आस्था असली तरी ते कुठल्याही सत्ताधार्‍यांना अडचणीचेच होते. त्यामुळे त्यांना सत्तेत कधी स्थान मिळालं नाही. कुणी आमदार झालं, काहींना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं. मात्र, गोर्‍हेंचा कुणीही विचार केला नाही. याची खंत त्यांच्या मनात होती. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा प्रखर होती. जेव्हा पवारांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तेव्हा आपण ज्या चळवळीतून आलो आहोत, ज्या विचारांनी पुढे जात आहोत ते विचारच अडचणीचे ठरत आहेत का, असा त्यांनी विचार केला असावा आणि मग त्यांनी पूर्ण 360 अंशांनी वेगळा विचार करून शिवसेनेची वाट स्वीकारली. त्यांच्यामुळे शिवसेनेला पक्षाच्या स्वभावाला साजेशा आक्रमक मात्र सोबतच अत्यंत अभ्यासू आणि स्वतःची संघटना असलेल्या नेत्या मिळाल्या.
शिवसेनेच्या माध्यमातून नीलमताईंंन महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. आपल्या कर्तृत्वावर त्यांनी शिवसेनेत उपनेतेपद, पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपद, आमदारकी आणि प्रवक्तेपदही मिळवलं. 2002 सालापासून त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. शिवसेनेची महिला आघाडी मजबूत नव्हती. राजीव गांधी सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडलं, त्यावेळी शिवसेनेकडे अभ्यासू महिला नेत्याचा चेहरा नव्हता. शिवसेनेने ज्या महिलांना विधान परिषदेसाठी, नगरसेवकपदासाठी किंवा इतर पदांसाठी उमेदवारी दिली ती त्या महिलांच्या कर्तृत्वामुळे दिली गेलेली नाही. शिवसेनेच्या एखाद्या नेत्याची पत्नी, मुलगी अशा जवळच्या नातलगांनाच ही पदं मिळायची. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे या शिवसेना महिला आघाडीत सक्रीय असल्या तरी त्या उद्धव ठाकरेंच्या पत्नी आहेत. नीलम गोर्‍हे पहिल्या महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शिवसेनेत महिला नेतेपद मिळवलं. नीलमताई शिवसेनेत आल्या. मात्र, त्यांची वाट सोपी नव्हती. पक्षात आल्याबरोबर त्यांनी झपाट्याने काम सुरू केलं. त्यामुळे त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागली. नीलमताईंच्या कार्यामुळे आणि त्यांची राजकीय समज यामुळे सर्वच पक्षात त्यांच्याबद्दल आदर आहे.
 विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं. मात्र, आपलं कॅलिबर मंत्रीपदाचं आहे हे त्यांना माहिती होतं. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नीलम गोर्‍हेंना मंत्रिपद किंवा किमान राज्यमंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, शिवसेनेतली लॉबी इतकी स्ट्राँग होती की तेही शक्य झालं नाही. या सर्वांमुळे नीलम गोर्‍हे दुखावल्या होत्या. बाळासाहेबांच्या मर्जीतल्या नेत्या असूनही आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे उपचार म्हणून विधान परिषदेचं उपसभापतीपद तरी देऊया, असं उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. ही त्यांची अपरिहार्यता आहे. नीलम गोर्‍हे उपसभापती झाल्या असल्या तरी त्यांची क्षमता ही मंत्री होण्याची आहे, एवढं नक्की. महिलांवरील अत्याचार आणि आवाज उठवण्याचं मोठं काम नीलम गोर्‍हेंनी केलं आहे. वेगवेगळी वृत्तपत्र, मासिकं आणि दिवाळी अंकातून त्यांनी 700च्या वर लेख लिहिले आहेत. 1984 साली त्यांनी स्त्री आधार केंद्राची स्थापना केली.’उरल्या कहाण्या’ या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं श्रेष्ठता पारितोषिक मिळालं आहे. तर त्यांच्या पहिल्याच कथेला किर्लोस्कर पारितोषिक मिळालं होतं. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर त्यांनी 500 हून अधिक व्याख्यानं दिली आहेत. 1999-2000 महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा होत्या. चित्रपट सेन्सॉर बोर्ड आणि नाट्य परिक्षण मंडळावरही त्यांनी कार्य केलं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः णछच्या माध्यमातून त्या अनेक संस्थांशी निगडित आहेत आणि तिथंही त्यांनी बरंच काम केलं आहे.
उपसभापतीपदावर काम करताना, सत्ताधारी पक्षाचे हितसंबंध सांभाळतानाच विरोधी आमदारांचा आवाज दाबला जाणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. शिवसेनेतील आक्रमक नेत्या म्हणून आपली छबी बाजुला ठेऊन एक निष्पक्षपातीपणा त्यांना दाखवून द्यावा लागेल. नीलमताईंच्या रुपाने एक अभ्यासू व्यक्ती उपसभापतीपदावर विराजमान झालीय. नीलमताईंना मनःपुर्वक शुभेच्छा देतानाच  उपसभापतीपदाचा सन्मान त्या राखतीलच आणि ज्या शोषितांच्या चळवळीतून त्या पुढे आल्यात त्यांना न्याय देण्याचाही त्या प्रामाणिक प्रयत्न करतील, अशी आशा करुया.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...