Thursday 2 November 2017

मुंबई-गोवा महामार्ग विकणे आहे!

दैनिक महाराष्ट्र दिनमानच्या या लेखाने तरी सरकार आणि प्रशासनाला कोकणही महाराष्ट्रात येते, याचे भान वाटावे!...
मुंबई-गोवा महामार्ग विकणे आहे!
मा. मुख्यमंत्री साहेब, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा जो काही धडाका आपल्या नेतृत्वाखाली सरकारने लावला आहे ते पाहून आम्हा कोकणवासीयांना जणू आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही गौरी-गणपती उत्सवादरम्यान महामार्गावरील प्रत्येक खड्डा न खड्डा जातीने पुढाकार घेवून बुजवल्याबद्दल त्यांच्याही धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पनवेल, पेण, वडखळ, माणगाव, इंदापूर, रायगड, रत्नागिरी ते अगदी सिंधुदुर्ग, गोव्याच्या टोकापर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा आणि धुळीच्या साम्राज्याने नटलेला रस्ता नसल्याने आपले मानावे तितके आभार थोडकेच आहेत. पण, आम्हा कोकणवासीयांना अशा गुळगुळीत आणि चहूबाजूंनी विस्तीर्ण असलेल्या महामार्गाची सवय नाही. त्यामुळे कृपा करून सरकारने हा महामार्ग आता विकत घ्यावा. अगदी त्याची बोली लावल्यासही आपणला नक्कीच मोठी किमत येईल. सन्मानीय मुख्यमंत्रीसाहेब या महामार्गावरून आपण किंंवा आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी कुटुंबकबिल्यासह कधी प्रवास केला नसेल तर नक्कीच करा. कोकणच्या वाटेवर आपले स्वागत आहे. या वाटेवर आपल्या वाटेत एकही खड्डा आडवा येणार नाही. धुळीने माखलेल्या रस्त्यावरून आपले वाहन पुढे सरकताना आपल्याला सर्वत्र धुरके पसरल्याचा नजारा दिसेल. अगदी हायफाय गाडीतून या मार्गावरून आपण गेल्यास आपल्याला नौकेतून प्रवास केल्याचा अवर्णनीय आनंद घेता येईल. हा चार तासांचा आपला आरामदायी प्रवास अगदी सात ते आठ तासांपर्यंत लांबल्यास आपल्याला कंबरदुखी, मानदुखी आणि अंगदुखीचा जराही त्रास जाणवणार नाही.
सन्मानीय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी घोषणा नुकतीच केली आहे. ते कार्यसम्राट नेते आहेत याबाबत वाद नाही. पण, गडकरी साहेब आपण महामार्ग चौपदरीकरणाची इतकी घाई करू नये. पूर्णपणे खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला आपण यातून बाहेर काढण्यासाठी थोडसे प्रयत्न केले तरीही आम्हा कोकणवासीयांना हायसे वाटेल. आमचे कोकण नैसर्गिकदृष्टया संपन्न आहे इथे पाण्या-पावसाचा तोटा नाही. पण, पावसाच्या तडाख्यात पीकपाण्याची वाट लागली तरी चकार शब्द मुखातून काढायचा नाही, असा आमचा कोकणी स्थायीभाव आमची ठायी ठायी परीक्षा घेतो आहे. कुणीही यावे नी टपली मारून जावे. कोकणची माणसे साधी भोळी. आमच्या कोकणातील नेतेही त्यांच्याच विश्वात मश्गुल आहेत. माझे गाव सुधारले म्हणजे देशही सुधारला, अशी कदाचित त्यांची भावना. आमच्या कोकणातील पत्रकारांनीही मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूच्या तांडवावर आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर अनेकदा सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कासवगती कारभाराचे वाभाडे काढले. इतकेच काय आंदोलनेही उभारली. पण, कोकणच्या दुरवस्थेकडे बघण्यासाठी मायबाप सरकारला व्यस्त वेळापत्रकामुळे वेळ नाही. कोकणला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महार्गाच्या माध्यमातून विकासाचा पाया आपल्या मा. मुख्यमंत्री साहेबांनी रचला. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण नागपूरचे आहात म्हणून नागपूरविषयी दाखवलेला जिव्हाळा आणि विकासाच्या महामार्गाचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आम्ही कोकणी माणसं तशी समाधानीच. आहे त्यात भागवायचे आणि कुणाच्या ताटाकडे बघायचे नाही, हा आमचा स्थायीभाव. पण, आमच्या ताटात असलेलं तरी नीट वाढा, ही साधी अपेक्षा धरणेही आमच्यासाठी गुन्हा ठरावा का, याचे उत्तर जमल्यास मुख्यमंत्री साहेब आपण द्याल अशी अपेक्षा हा कोकणी माणूस बाळगतो. केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मंत्री सुनील तटकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम अशी कोकणच्या नेत्यांची फळीच्या फळी असूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची कहाणी आजही संपलेली नाही. दरवर्षी गौरी-गणपतीत महामार्गाच्या दुरवस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर तात्पुरती मलमपट्टी करायची. त्यानंतर कोकणवासीयांच्या हालाकडे आणि महामार्गाच्या बिकट वाटेकडे फिरकूनही बघायचे नाही, असा सरकारी दंडकच अनेकांनी घालून घेतला आहे की काय, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
अरुंद महामार्ग, खड्डेमय आणि धुळीच्या रेषा हवेत काढणे हा कोकणच्या पर्यटन विकासाचा महामार्ग येत्या काळात तर कूस बदलेल, ही भाबडी आशाही आमच्या कोकणी माणसाने आता सोडून दिली असावी. अपघाताचे केंद्र आणि मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर दररोज घडणार्‍या अपघातांत कीड्या-मुंग्यांप्रमाणे माणसे मरत असल्याचे दु:ख करण्यापलीकडे कोकणवासीयांना आता पर्याय राहिलेला नाही. तूर्त राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे मा. मुख्यमंत्री साहेब आता तरी कोकणी माणसाच्या या पत्रप्रपंचाची दखल घेतील, अशी अपेक्षा बाळगू या!
...........................................................
पनवेल, पेण, वडखळ, माणगाव, इंदापूर, रायगड, रत्नागिरी ते अगदी सिंधुदुर्ग, गोव्याच्या टोकापर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा आणि धुळीच्या साम्राज्याने नटलेला रस्ता नसल्याने मायबाप सरकारचे मानावे तितके आभार थोडकेच आहेत. पण, आम्हा कोकणवासीयांना अशा गुळगुळीत आणि चहूबाजूंनी विस्तीर्ण असलेल्या महामार्गाची सवय नाही. त्यामुळे कृपा करून सरकारने हा महामार्ग आता विकत घ्यावा.
................................................
................................................
विनोद साळवी, दैनिक महाराष्ट्र दिनमान

अग्रलेख २ नोव्हेंबर, २०१७ थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे..

अग्रलेख २ नोव्हेंबर, २०१७

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे..
खरंच, थुंकणे हा आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जिथे जाऊ तिथे मिळवण्याइतके आपण निर्लज्ज आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल तशा, उचित-अनुचित मतांच्या पिचकाऱ्या मारता येतात आणि पानाचे तोबरे ठासलेल्या तोंडाने दिसेल  त्या भिंतीवर, रस्त्यावर, लिफ्टमध्ये, इमारतीच्या जिन्यांवर, कुठल्याही कोपऱ्यात लालभडक पिंकही उडवता येते हे आपल्याला बरोब्बर कळते. पण अधिकारांबरोबर जबाबदारीही येते या उक्तीकडे मात्र सर्वजण पिचकारीबहाद्दरांसारखे पिंक टाकून पाठ वळवतात. झाली भिंत खराब होऊ दे, झाला जिना खराब होऊ दे, झाली लिफ्ट खराब होऊ दे.. आपल्या घरात थोडीच ही रंगरंगोटी आपण करतोय? इतका बेभान निर्लज्जपणा आपल्या अंगी मुरलेला आहे. ठाण्याचेच उदाहरण घ्या. गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळील पदपथावर महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी आकर्षक रंगसंगतीचा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर अंतराळातील विश्व दाखवणारे वॉलपेपर लावले होते. मात्र जिथेतिथे पिचकाऱ्या मारण्याच्या आपल्या हक्काबाबत कमालीचे उत्साही असणाऱ्या निर्लज्ज ठाणेकरांनी या रंगसंगतीत पानाच्या पिचकाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. शहर स्वच्छतेच्या आघाडीवर ठाणे शहराचा नावलौकिक वाढावा यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या एका चांगल्या उपक्रमाची या विकृतांनी वाट लावून टाकली आहे. आय़ुक्तांच्याच पुढाकाराने वर्तकनगर परिसरातील कॅडबरी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर महापालिकेने या भागातील भिंती रंगविण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला. शहरातील शेकडो कलाकारांनी या भिंती मेहनतीने रंगवल्या आहेत. येणाऱ्याजाणाऱ्यांचे, वाहनांमधील प्रवाशांचे या सुंदर रंगवलेल्या भिंती लक्ष वेधून घेत असतात. तसेच काहीतरी रेल्वे स्थानक, गडकरी रंगायतन, तलावपाळी या लोकप्रिय भागात करावे असा आय़ुक्तांचा मानस होता. आठवडय़ाच्या अखेरीस गडकरी आणि तलावपाळी परिसर तरूणाईच्या उत्फुल्ल अस्तित्वाने भारलेला असतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने गडकरी रंगायतनलगत सेल्फी कट्टा उभा केला. या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांनी आकर्षक रोषणाईही केली होती. त्याच कट्ट्याची काही विकृत ठाणेकरांनी वाट लावली आहे. सर्व परिसरात थुंकून घाण करणाऱ्या याच विकृतांनी सेल्फी पॉइंटजवळच छायाचित्रासाठी ठेवण्यात आलेले अवकाशयान तलावाजवळच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले होते. असे विकृत फक्त ठाण्यातच नाहीत तर, सर्वत्र आढळतात. जे काही चांगले दिसेल त्याची वाट लावण्याची, पिचकाऱ्या मारण्याची, ओरखडे ओढण्याची, विद्रुपीकरण करण्याची खाज या विकृत महाभागांना सुटलेली असते. कुणी काही चांगले केले त्याची आम्ही कशी वाट लावू शकतो असा पुरुषार्थ दाखवण्याची उबळ यांना येत असावी. ठाण्यातील हे प्रातिनिधीक उदाहरण सांगितले. पण बहुसंख्य भारतीयांना ही व्याधी जडलेली आहे. विद्रुपीकरणाची साथ आपल्याला गडकिल्ल्यांवर दिसते, ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी दिसते, सार्वजनिक स्थळांवर दिसते, सुंदर बागांमध्ये दिसते. इतिहासातील प्रेरक घटनांच्या साक्षीदार असलेल्या चिरेबंदी भिंतींवर, बुरजांच्या, गडांच्या दरवाजांवर नावे लिहिली जातात, मदनबाण काढले जातात, अश्लील शेरे लिहिले जातात. सुंदर बगिच्यांमधील, अभयारण्यातील मोठमोठ्या झाडांवर अणुकूचीदार वस्तूने असेच विद्रुपीकरण केले जाते. थुंकण्याची, पानाच्या पिचकाऱ्या मारण्याची तर सार्वत्रिक स्पर्धा देशभर सुरू असते. त्याचे कुणालाच काही वाटत नाही. मागे ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूल एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनतीने स्वच्छ करून पुलाच्या भिंतींवर सामाजिक जनजागरणाच्या घोषणा रंगवल्या होत्या, त्या घोषणांशी सुसंगत चित्रे काढली होती. काही महिन्यांतच ही सर्व चित्रे पानाच्या पिचकाऱ्यांनी भरून गेली. पुन्हा सर्व भिंती पाण्याने धुवून, तारेच्या ब्रशने खरवडून साफ कराव्या लागल्या. जे ठाण्यात तेच इतरत्रही. कुर्ला, परळ, एल्फिन्स्ट्न रोड स्थानकांच्या पादचारी पुलांवरही सुंदर चित्रे रंगवली गेली होती. त्याचीही या विकृतांनी अशीच वाट लावली. अशा वेळी मनात एकाच वेळी संताप आणि उद्वेग दाटून येतो. कशासाठी सुंदर चित्रे काढायची?, सार्वजनिक स्थळांची स्वच्छता ठेवायची?, सेल्फी पॉईंट उभारायचे? स्वच्छतेची जाणीव लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवावी लागते. घरातील मोठ्यांनीच स्वच्छतेचे बाळकडू द्यावे लागते. पण तसे होत नाही. काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकातच तिकीट खिडकीच्या रांगेत एक कुटुंब उभे होते. छोटी मुलगी वडिलांचा हात धरून उभी होती. ती पच्कन थुंकली. बहुदा बापानेच तिला इथे तिथे थुंकण्याचे प्रात्यक्षिक दाखवले असणार. मुलीनेही त्याचेच अनुकरण केले. हा उद्वेग मनाला छळत असताना, जेव्हा एका सहकाऱ्याचा छोटा मुलगा डोंबिवलीत खाल्लेल्या चॉकलेटचं वेष्टन रस्त्यावर फेकून न देता खिशात ठेवताना दिसतो तेव्हा मनाला थोडी उभारी येते. सारेच संपलेले नाही तर, असा दिलासा मिळतो.

०००००००००

Maharashtra Dinman 2 November 2017 Page 1


महाराष्ट्र दिनमान २ नोव्हेंबर, २०१७ पान २


भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...