Thursday 2 November 2017

अग्रलेख २ नोव्हेंबर, २०१७ थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे..

अग्रलेख २ नोव्हेंबर, २०१७

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे..
खरंच, थुंकणे हा आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जिथे जाऊ तिथे मिळवण्याइतके आपण निर्लज्ज आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल तशा, उचित-अनुचित मतांच्या पिचकाऱ्या मारता येतात आणि पानाचे तोबरे ठासलेल्या तोंडाने दिसेल  त्या भिंतीवर, रस्त्यावर, लिफ्टमध्ये, इमारतीच्या जिन्यांवर, कुठल्याही कोपऱ्यात लालभडक पिंकही उडवता येते हे आपल्याला बरोब्बर कळते. पण अधिकारांबरोबर जबाबदारीही येते या उक्तीकडे मात्र सर्वजण पिचकारीबहाद्दरांसारखे पिंक टाकून पाठ वळवतात. झाली भिंत खराब होऊ दे, झाला जिना खराब होऊ दे, झाली लिफ्ट खराब होऊ दे.. आपल्या घरात थोडीच ही रंगरंगोटी आपण करतोय? इतका बेभान निर्लज्जपणा आपल्या अंगी मुरलेला आहे. ठाण्याचेच उदाहरण घ्या. गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळील पदपथावर महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी आकर्षक रंगसंगतीचा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर अंतराळातील विश्व दाखवणारे वॉलपेपर लावले होते. मात्र जिथेतिथे पिचकाऱ्या मारण्याच्या आपल्या हक्काबाबत कमालीचे उत्साही असणाऱ्या निर्लज्ज ठाणेकरांनी या रंगसंगतीत पानाच्या पिचकाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. शहर स्वच्छतेच्या आघाडीवर ठाणे शहराचा नावलौकिक वाढावा यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या एका चांगल्या उपक्रमाची या विकृतांनी वाट लावून टाकली आहे. आय़ुक्तांच्याच पुढाकाराने वर्तकनगर परिसरातील कॅडबरी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर महापालिकेने या भागातील भिंती रंगविण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला. शहरातील शेकडो कलाकारांनी या भिंती मेहनतीने रंगवल्या आहेत. येणाऱ्याजाणाऱ्यांचे, वाहनांमधील प्रवाशांचे या सुंदर रंगवलेल्या भिंती लक्ष वेधून घेत असतात. तसेच काहीतरी रेल्वे स्थानक, गडकरी रंगायतन, तलावपाळी या लोकप्रिय भागात करावे असा आय़ुक्तांचा मानस होता. आठवडय़ाच्या अखेरीस गडकरी आणि तलावपाळी परिसर तरूणाईच्या उत्फुल्ल अस्तित्वाने भारलेला असतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने गडकरी रंगायतनलगत सेल्फी कट्टा उभा केला. या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांनी आकर्षक रोषणाईही केली होती. त्याच कट्ट्याची काही विकृत ठाणेकरांनी वाट लावली आहे. सर्व परिसरात थुंकून घाण करणाऱ्या याच विकृतांनी सेल्फी पॉइंटजवळच छायाचित्रासाठी ठेवण्यात आलेले अवकाशयान तलावाजवळच असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले होते. असे विकृत फक्त ठाण्यातच नाहीत तर, सर्वत्र आढळतात. जे काही चांगले दिसेल त्याची वाट लावण्याची, पिचकाऱ्या मारण्याची, ओरखडे ओढण्याची, विद्रुपीकरण करण्याची खाज या विकृत महाभागांना सुटलेली असते. कुणी काही चांगले केले त्याची आम्ही कशी वाट लावू शकतो असा पुरुषार्थ दाखवण्याची उबळ यांना येत असावी. ठाण्यातील हे प्रातिनिधीक उदाहरण सांगितले. पण बहुसंख्य भारतीयांना ही व्याधी जडलेली आहे. विद्रुपीकरणाची साथ आपल्याला गडकिल्ल्यांवर दिसते, ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी दिसते, सार्वजनिक स्थळांवर दिसते, सुंदर बागांमध्ये दिसते. इतिहासातील प्रेरक घटनांच्या साक्षीदार असलेल्या चिरेबंदी भिंतींवर, बुरजांच्या, गडांच्या दरवाजांवर नावे लिहिली जातात, मदनबाण काढले जातात, अश्लील शेरे लिहिले जातात. सुंदर बगिच्यांमधील, अभयारण्यातील मोठमोठ्या झाडांवर अणुकूचीदार वस्तूने असेच विद्रुपीकरण केले जाते. थुंकण्याची, पानाच्या पिचकाऱ्या मारण्याची तर सार्वत्रिक स्पर्धा देशभर सुरू असते. त्याचे कुणालाच काही वाटत नाही. मागे ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूल एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनतीने स्वच्छ करून पुलाच्या भिंतींवर सामाजिक जनजागरणाच्या घोषणा रंगवल्या होत्या, त्या घोषणांशी सुसंगत चित्रे काढली होती. काही महिन्यांतच ही सर्व चित्रे पानाच्या पिचकाऱ्यांनी भरून गेली. पुन्हा सर्व भिंती पाण्याने धुवून, तारेच्या ब्रशने खरवडून साफ कराव्या लागल्या. जे ठाण्यात तेच इतरत्रही. कुर्ला, परळ, एल्फिन्स्ट्न रोड स्थानकांच्या पादचारी पुलांवरही सुंदर चित्रे रंगवली गेली होती. त्याचीही या विकृतांनी अशीच वाट लावली. अशा वेळी मनात एकाच वेळी संताप आणि उद्वेग दाटून येतो. कशासाठी सुंदर चित्रे काढायची?, सार्वजनिक स्थळांची स्वच्छता ठेवायची?, सेल्फी पॉईंट उभारायचे? स्वच्छतेची जाणीव लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवावी लागते. घरातील मोठ्यांनीच स्वच्छतेचे बाळकडू द्यावे लागते. पण तसे होत नाही. काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकातच तिकीट खिडकीच्या रांगेत एक कुटुंब उभे होते. छोटी मुलगी वडिलांचा हात धरून उभी होती. ती पच्कन थुंकली. बहुदा बापानेच तिला इथे तिथे थुंकण्याचे प्रात्यक्षिक दाखवले असणार. मुलीनेही त्याचेच अनुकरण केले. हा उद्वेग मनाला छळत असताना, जेव्हा एका सहकाऱ्याचा छोटा मुलगा डोंबिवलीत खाल्लेल्या चॉकलेटचं वेष्टन रस्त्यावर फेकून न देता खिशात ठेवताना दिसतो तेव्हा मनाला थोडी उभारी येते. सारेच संपलेले नाही तर, असा दिलासा मिळतो.

०००००००००

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...