Sunday 30 June 2019

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळांच्या माथी हाणू काठी
तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच आहे याची सतत आठवण करुन देते आणि विद्रोही मनाला बजावत असते, सावधान...सजग रहा! यामुळे प्रचलित राजकीय, सामाजिक स्थितीचा विचार करता पूर्वीपेक्षा आता काही सुधारणा झालीय का? तर याचे उत्तर चक्क नाही असे आहे. उलट ही राजकीय आणि सामाजिक स्थिती अधिक मुजोर झाली आहे. म्हणजे काय तर, मानवाच्या अस्तित्वा अगोदर अस्तित्वात आलेले, लाखो वर्षापासून या पृथ्वीतलावर असलेला झुरळ नावाचे कीटक ज्यापध्दतीने नवनवे कीटकनाशके रिचवून अधिकाधिक सक्षम होत जाते त्याचप्रमाणे पुरुषसत्ताक पद्धती अस्तित्वात आल्यानंतर उदयास आलेली राजकीय व सामाजिक परिस्थिती, नव्या युगात नव्या रुपात आपले अस्तित्व टिकवून ठेवते.
कार्ल मार्क्स-फ्रेडरिक एंगल्स यांनी या राजकीय सामाजिक स्थितीचे वर्गीय विश्लेषण केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या परिक्षेत्रात याचे वर्णिय विश्लेषण केले. मार्क्स-एंगल्सने म्हटले जोपर्यंत वर्ग नष्ट होत नाही तोपर्यंत सर्वहाराकडे सत्ता येणार नाही. तर बाबासाहेबांनी म्हटले होते जोपर्यंत वर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांकडे सत्ता येणार नाही. मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणी मांडणार्‍या सिद्धांतकाराच्या आयुष्यात त्यांना अपेक्षित सत्ता आलेली पाहता आली नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही विचारसरण्यांची सत्ता अस्तित्वात आल्या. भारताचा विचार करता पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा या तीन राज्यात मार्क्सवादाला मानणार्‍या पक्षांनी जवळपास दोन अडीच तपे राज्य केले. तर आंबेडकरवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये राज्य केले. पण ना मार्क्सवादी विचारसरणी नुसार सर्वहाराचे राज्य पंचवीस वर्षाच्या सत्तेत येऊ शकले ना पाच वर्ष पूर्ण बहुमतात व दोनदा आघाडीचा प्रयोग करुनही सर्वसामान्यांच राज्य आंबेडकरवादी पक्ष आणू शकले.
जगात सोविएत युनियन ते चायना अशा पाचपंचवीस देशात थेट मार्क्सवादी शासनव्यवस्था अस्तित्वात येऊनही सर्वहारावर्गाचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकली नाही. आंबेडकरवादी केंद्रीय सत्तेत आले तरी तरी सर्वसामान्यांच राज्य येऊ शकणार नाही. याच कारण मार्क्सवादी अगर आंबेडकरवादी विचारसरणीत दोष आहे,असा अजिबात काढता कामा नये. हा दोष किमान  10 हजार वर्षे सत्तेवर आणि त्या अनुषंगाने राजकीय व सामाजिक परिस्थितीवर, व्यवस्थेवर भक्कम पकड असलेल्या पुनर्निर्देशित, पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. सगळ्यात वाईट बाब म्हणजे या पुरुषप्रधान  संस्चेकृतीच्य वाहक या स्त्रिया आहेत. प्रत्येक व्यवस्थेत मग ती सरंजामशाही व्यवस्था असो, राजेशाही व्यवस्था असो की लोकशाहीच्या आडून भांडवलशाही व्यवस्था असल्यास या प्रत्येक व्यवस्थेत पहिला बळी किंवा शोषण हे स्यियांचेच होत असते. तरी या प्रत्येक व्यवस्थेचा आत्मा असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या वाहक या स्त्रिया असतातच पण ही पुरुषसत्ताक व्यवस्था अधिक बळकट व्हावी म्हणून आपल्या मुलांवर बालवयातच त्यांच्यावर पुरुषसंस्कृतीचे संस्कार स्त्रिया करीत असतात? हे खरच धक्कादायक आहे. पण हे सत्य आहे. फक्त  आपल्या विरोधातील नव्हे तर जी व्यवस्था आपल्याला नष्ट करणार आहे त्याच व्यवस्थेला वर्षानुवर्षे कोणी कसे बळकट, मजबूत आणि अधिक धारधार करु शकतो? हे सारे आज कल्पनेच्या पलिकडे असले तरी वर्षानुवर्षाचे हे भयावह वास्तव आहे. 

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...