Thursday 23 November 2017

शेतकरी जागा झाला आहे... EDIT Maharashtra Dinman

अग्रलेख
शेतकरी जागा झाला आहे...

सोमवारी दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदेपर्यंतच्या परिसरात फक्त शेतकरी दिसत होते. मुंडासे बांधलेले, धोतर नेसलेले, अंगरखा, जाकिट घातलेले, कुणी तसेच उघडेवाघडे, दाढीचे खुंट वाढलेले.. पण चेहरे कुणाचेच म्लान नव्हते. आपल्या हक्कांसाठी लढायला हवे याचे भान शेतकऱ्यांना यायला लागले आहे याची चुणूक देणारा हा किसान मुक्ती संसद मोर्चा होता. हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सरकारचे शेतकरी धोरण याबाबत आजवरच्या प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली आहेत, त्या आश्वासनांवर विसंबून मतपेटीत शेतकऱ्यांची एकगठ्ठा मतेही पडली आहेत आणि नंतर याच शेतकऱ्यांच्या तोंडाला यथासांग पानेही पुसली गेली आहेत. हे दुष्टचक्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नशिबीचे भोग संपता संपत नाहीत. सत्तेवर येण्याआधी विरोधी पक्षांत असलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळतांना दिसतात, आंदोलने करताना दिसतात, प्रसंगी शेतकऱ्यांच्या घरी बसून भाकर खाताना दिसतात. शेतकऱ्याची दैन्यावस्था पाहून हळहळणारे विरोधक या शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा काढतात, लाँग मार्च काढतात, विधानसभेवर हल्लाबोल मोर्चा नेतात. शेतकऱ्यांना विरोधक हेच त्यांचे खरे कैवारी वाटू लागतात. सत्तेवर असणारे काहीही करत नाहीत, तुमच्या मागण्यांकडे लक्षही देत नाहीत, आम्ही सत्तेवर आल्यावर मात्र असे होणार नाही, तुमच्या एकूण एक मागण्या मार्गी लावल्या जातील, शेतमालाला हमीभाव मिळेल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तर चुटकीसरशी अमलात आणल्या जातील, कर्जमाफी तर झालीच समजा, तेच तर आमचे पहिले काम असेल... हे सगळे त्या गरीब, बिचाऱ्या शेतकऱ्याला विरोधी पक्ष पटवून देतात. तोही भाबडेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवतो. सत्तापालट होतो. कालचे विरोधक सत्तेवर येतात, सरकार स्थापन करतात आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्नसारखे शेतकऱ्याचे भोग मागील पानावरून पुढे सुरू राहतात. सत्तेवर आलेले शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवतात, सत्तेतून हकालपट्टी होऊन विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेले माजी सत्ताधारी शेतकऱ्यांचा कैवार घेऊन हिरीरीने बाह्या सरसावून रस्त्यावर उतरतात. शेतकऱ्यांना फसवण्याचा कार्यक्रम सुरूच राहातो. दिल्लीत शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी देशभरातील सुमारे १८० शेतकरी संघटनांच्या नेतृत्त्वाखाली गोळा झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या फसवणुकीची झापडे आता झुगारून दिली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांतील हजारो शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून, दुर्गम भागांतून, गावखेड्यातून जो शेतकरी दिल्लीत जमा झाला होता त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. संसद भवनासमोरच झालेल्या किसान संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शब्दांत या महिलांनी टीका केली. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ असे म्हटले होते. भाव तर दिला नाही, पण नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले. तेही झालेले नाही, शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, अशी या महिलांची आणि शेतकऱ्यांची भावना झाली आहे. मोदींचे जुमले आता चालणार नाही, असे या महिला म्हणत होत्या. महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचाही आंदोलनात सहभाग होता. आजवरच्या फसवणुकीला नकार देणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्धार किसान मुक्ती संसदेत व्यक्त झाला. आश्वासने बास्स झाली, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमाफी द्या या त्यांच्या प्रमुख मागण्या आक्रमकपणे शेतकरी मांडू लागले आहेत. शेतकरी खऱ्या अर्थाने जागा झाला आहे हेच यातून दिसते. जे दिल्लीत दिसले तेच गेले काही महिने महाराष्ट्रात दिसत आहे. कर्जमाफीची जाहिरातबाजी झाली पण, प्रत्यक्ष हातात दमडीही आलेली नाही, ही फसवणूक शेतकऱ्यांना कळली आहे. स्वामीनाथन आयोग शिफारसींबद्दल भाजपा विरोधी पक्षांत असताना कमालीचा आग्रही आणि आक्रमक होता. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या शिफारसींच्या अमलबजावणीसाठी आग्रही होते. सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी स्वामीनाथन शिफारसींचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. काँग्रेस असो वा भाजपा गेली १३ वर्षे या शिफारसींकडे कुठल्याही सत्ताधारी पक्षाने लक्ष दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. काँग्रेसच्या काळातही आत्महत्या होतच होत्या, असले हृदयशून्य वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर शेतकरी कमालीचा नाराज आहे. भाजपाच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश प्रत्येक राज्यातील शेतकऱ्याला आता आश्वासने, भुलथापांचा डोस विषारी फवाऱ्यासारखा वाटायला लागला आहे. भाजपाच नव्हे तर प्रत्येक पक्षासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

पालक, मुलांत सुसंवाद सदा घडो!

महाराष्ट्र दिनमानमधील शल्यक्रिया

आपला ब्लॅक अँड व्हाईट आणि आताचे एलईडी सीरीजच्या पुढे गेलेले टेलिवर्तन, पेजरवर उशिराने पडणार्‍या मेसेजला कधीच मागे टाकून ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकी चेहरा बनलेले जग आताच्या पालकासाठी पाल्याला समजून घेताना मोठे आव्हान बनले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबांतही मोबाईल आणि टीव्हीमॅनिया झाला असताना तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला स्वीकारावेच लागत आहेत.

बालपणीचा काळ सुखाचा, रम्य ते बालपण, बालपण दे गा देवा..हा आपल्या नकळत्या वयातील फ्लॅशबॅक डोळ्यांपुढे तरळू लागल्यावर आजची पिढी आणि आमची पिढी, हा आताच पालक आणि पूर्वीचा बालक यांच्यातील उजव्या आणि डावेपणावर चर्चा झडू लागतात. हल्लीची पिढी सुस्साट, कुणाचे ऐकत नाही, रागाचा पारा कायम चढलेला, आपल्या आयुष्याचे निर्णय झटपट घेते, आई-वडिलांना विश्वासात न घेता टोकाचा निर्णय घेण्यासही मागे-पुढे पाहत नाही, अशी तक्रारपेटी बालक ते पालक प्रवास करणार्‍या प्रत्येकांच्या घरात आहे. सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बालक असलेला आणि आता पालकत्वाची जबाबदारी सांभळणारा प्रत्येक जण आपल्या जमान्यातील संस्काराची पाटी आपल्या पाल्यापुढे कायम वाचून दाखवत आहे. खो-खो, लंगडी, हुतूतू, लपाछपी, गोट्या, भवरा, विटी-दांडू अशा मैदानी खेळांत अगदी आईचा धपाटा पडेपर्यंत मन गुंतवणारा आजचा पालक त्याचा सुवर्णकाळ जागवत आहे. वडिलांची ऑफिसातून घरी परतण्याची वेळ झाल्यावर सायंकाळी घराचा कोनाडा पकडून पुस्तकात मान खुपसणारे डोकेही आठवते. आपण काय वाचतोय, लिहितोय यापेक्षा वडिलांविषयी असलेली आदरयुक्त भीतीही त्याचा भाग होता. आजच्या नवीन पिढीशी या भीतीची तुलना होताना आपण आपल्या पाल्यासोबत कसे आणि किती हितगुज साधतो? याचे उत्तर शोधल्यास आपला ब्लॅक अँड व्हाईट आणि आताचे एलईडी सीरीजच्या पुढे गेलेले टेलिवर्तन, पेजरवर उशिराने पडणार्‍या मेसेजला कधीच मागे टाकून ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकी चेहरा बनलेले जग आताच्या पालकासाठी पाल्याला समजून घेताना मोठे आव्हान बनले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबांतही मोबाईल आणि टीव्हीमॅनिया झाला असताना तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला स्वीकारावेच लागत आहेत. तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुणाची फेसबुक लाईव्ह आत्महत्या, आई-वडिलांनी लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीची गळफास घेवून आत्महत्या, मोबाईल गेममुळे विद्यार्थ्याची आत्महत्या अशा काळजाचे ठोके थांबवणार्‍या घटना सातत्याने समाजमनावर आदळत आहेत. परीक्षेत नापास झाल्याने जीवनयात्रा संपवणारे विद्यार्थी, बलात्कार, विनयभंग आणि छेडछाडीसारख्या घटनांत बालगुन्हेगारांची वाढती संख्या याकडे होणारे दुर्लक्ष आणखी चिंता वाढवत आहे. मुलांच्या हौसेला मोल नाही, जे मला मिळाले नाही ते माझ्या मुला-बाळांना मिळाले पाहिजे, दुसर्‍याकडे आहे मग आपल्याकडे का नाही, हे लाड-प्रेम स्वाभाविक आहे. मात्र त्याचा अतिरेक आपल्याच पाल्यासाठी घातक ठरत आहे. एका गरीब भाजी विक्रेत्या महिलेने वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेल्या आपल्या मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवला. याबदल्यात या मुलाने शिकून-सवरून मोठे व्हावे, आपल्या आयुष्याला दिशा द्यावी, गरीबीच्या शापातून मुक्त व्हावे, अशी या माउलीची इच्छा. एकेदिवशी याच तरुण मुलाने तिच्याकडे  मोटरसायकल घेण्यासाठी हट्ट धरला. आईनेही भाजी विक्रीतून मिळणार्‍या पैशातील पै-पै जमवून या मुलाला मोटारबाईक घेवून दिली. पण, वाईट संगतीला लागलेल्या या मुलाला आई आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टांचा विसर पडत गेला. रात्रभर दारू पार्ट्या झोडून मित्रांसोबत झिंगणार्‍या या एकुलत्या एक मुलाचा बाईक अपघातात मृत्यू झाल्यानंतर जिवंत असून मरणासन्न झालेली आई तिची व्यथा कुणाला सांगणार? आपल्या मुलाचे लाड पुरवताना या माउलीचे नेमेके कुठे चुकले? आई-वडिलांचा संघर्ष डोळ्यादेखत पाहणारी मुले आणि मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून न देणारे पालक अशा अनेेक गोष्टी यासाठी चर्चेला कारण ठरते. पण, पालक म्हणून फक्त मुलांना आणि नवीन पिढीला दूषणे देवून आपली जबाबदारी संपते का? चांगला माणूस घडवण्याचे काम करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कितपत समजून घेत आहेत? हैदराबादमध्ये बारावीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला बाकावर अश्लील लिहिल्याने दोन शिक्षकांनी एका खोलीत डांबून बेदम चोप दिला. इतकेच नाहीतर प्राचार्यांकडे त्याची तक्रार करून त्याचे कॉलेजातून नाव काढून टाकण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे मानसिक ताणतणावाखाली गेलेल्या विद्यार्थ्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. 14 सप्टेंबर 2017 रोजी उघड झालेल्या या घटनेमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या मुलाचे भलेही चुकले असले पण, शिक्षक किंवा पालकांनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला का? ही प्रत्येक घराघरांत लंगडी पडणारी बाजू यावर सखोल चर्चा होण्याऐवजी मानसिक विकृती आणि प्रकृतीवरच काथ्याकूट सुरू आहे. दहावीला 87 टक्केपर्यंत गुण मिळवलेल्या या मुलाने इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. कॉलेजची फी वेळेत न भरल्याने मुलांना सवार्र्ंसमोर अवमानित करणे, उशिरा आल्यास, वर्गात बोलल्यास कडक शिक्षा देणे ही अर्धशिक्षित मास्तरकी गाजवण्याचा एककलमी कार्यक्रमही या कॉलेजात असल्याचे आत्महत्याग्रस्त मुलाच्या मित्रानेच सांगितले होते. मुळात आपल्याच नाण्याची ही दुखरी बाजू तपासताना पालक, शिक्षक, आई, वडील, भाऊ , बहीण, काका, मामा म्हणून आपलाच आपल्याशी तुटक होत चालेला संवाद हाच मोठा आजघडीचा आजार मानावा. आपल्यातील बालक, पालक म्हणून घडताना मूल जन्माला घालण्यापेक्षा मुलांना समजून घेणे हेच आजच्या पिढीचे आव्हानही आपण वेळीच ओळखले पाहिजे. आजच्या नकारात्मक वातावरणात अभ्यासात प्रगती नसल्याने मुलाबाबत चिंतित असलेल्या पालकांची काळजी त्रिशनीत अरोरा या मुलाने मिटवली. त्रिशनीतने आपली आवड हेच त्याच्या यशाचे रसायन बनवताना वयाच्या 23 व्या वर्षी तो सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनला आहे. फेसबूकवर सुरू करण्यात आलेल्या ह्यूमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या एका पेजवर त्याच्या जीवनाची प्रेरणादायी स्टोरी शेअर करण्यात आली आहे. समाजमाध्यमांतील या चांगल्या, वाईट गोष्टींवरही येत्या काळात पालक आणि बालकांत सुसंवाद घडो, इतकेच.

विनोद साळवी




भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...