Tuesday, 19 December 2017

भाजपासाठी धोक्याची घंटा, अग्रलेख, महाराष्ट्र दिनमान, Gujrat election results, BJP, Rahul Gandhi, Modi, Page 4

अग्रलेख
भाजपासाठी धोक्याची घंटा
गुजरातमध्ये भाजपाने सत्तासूत्रे ताब्यात ठेवली आहेत. पण २०१२ भाजपाचा परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. विकासाचे ढोल आणि गर्वी गुजरातच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाला गुजरात तो आपणांच छे... असा आत्मविश्वास वाटत होता. अमित शहा यांनी तर गुजरातमध्ये दीडशेहून अधिक जागांवर भाजपाचा विजय नक्की, असा आत्मविश्वास वेळोवेळी व्यक्त केला होता. राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर ही सगळी तर लिंबुटिंबू गँग. यांची मोदी, शहांसमोर काय मातब्बरी असा प्रारंभी भाजपाचा समज झाला होता. जेव्हा प्रचार पेटला, धमासान सुरू झाली तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असल्याची जाणीव हळूहळू भाजपाला व्हायला लागली. मग गुजरातसारख्या होम पीचवरील निवडणुकीसाठी खुद्द मोदींना गुजरातमध्येच तळ ठोकण्याची वेळ आली. राजकारणात भाजपा करील ते सर्व काही क्षम्य या गर्वापोटी चारित्र्यहनन, कुचेष्टा, हेटाळणी, सोशल मीडियावरील अपमान, विकास सोडून बाकी सर्व वांझोट्या चर्चा, रेटून खोटे दावे, खोटे आरोप सारी हत्यारे भाजपाने बाहेर काढली आणि राहुल, हार्दिक यांच्यासाठी प्रामुख्याने मनमुराद वापरलीही. यामुळे गुजरातच्या रणधुमाळीत सेक्स सीडी आली, राहुल गांधी यांचे देवदर्शन आले, त्यांचा धर्म कुठला याबद्दलही चर्चा झाली, काँग्रेसमध्ये कशी घराणेशाही आहे यावरही टीका करून झाली, मणिशंकर अय्यर यांनी वापरलेल्या शब्दामुळे मला कशा वेदना झाल्या म्हणत अश्रूपातही झाला. पण या अश्रूंची अपेक्षित फळे अर्थात मते काही भाजपाच्या पदरात पडलेली दिसत नाहीत. दीडशे जागांवर विजय सोडा पण होत्या त्या जागाही भाजपाने गमावल्या आहेत. भाजपाच्या जागांचा आकडा कमी झाला, मतांची टक्केवारीही कमी झाली आणि ज्याला पप्पू म्हणून यथेच्छ हिणवले जात होते, कलका बच्चा म्हणून सदोदीत अपमानित केले जात होते, त्याच राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या जागा मात्र गुजरातमध्ये वाढल्या आहेत. गुजरातमधील जागा वाढल्यामुळे राहुल नेतृत्त्वाची एक कठीण परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आणि  २२ वर्षे जिथे एकहाती सत्ता राबवली तिथे जेमतेम सत्ता राखण्याइतके बळ मिळावे अशी भाजपाची दुर्दशा झाली आहे. गुजरातमध्ये सुमारे ८ कोटी मतदार आहेत. त्यापैकी दोन कोटी तर भाजपाचे सदस्य आहेत. तरीही अपेक्षित मते भाजपाला का मिळू नयेत याचा विचार करण्याची सुवर्णसंधी गुजरातच्या निकालाने भाजपाला दिली आहे. अमित शहा यांनी मात्र मते वाढल्याचा दावा केला आहे. मते वाढली आणि जागा मात्र कमी झाल्या असे हे अजब तर्कट आता भाजपाला लढवावे लागत आहे. प्रचाराची पातळी घसरली होती, काँग्रेसने जातीयवादी प्रचार केला असा आरोपही त्यांनी केला आहे. शहा यांनी केलेले हे आरोप भाजपालाही लागू होतात, असे कुणीतरी त्यांना सांगायला हवे आहे. आठ कोटी मतदार आणि जवळपास दोन कोटी भाजपा सदस्य असताना पाच लाख मते नोटा म्हणून नोंदवली जातात हा कौल गेली २२ वर्षे गुजरातमध्ये विकास करणाऱ्या भाजपाविरोधात आहे असेच समजावे लागेल. सहाव्यांदा सत्तेवर येताना भाजपाला गुजरातने दिलेला धडा लक्षात घ्यावा लागेल. नोटबंदी, जीएसटी यामुळे गुजराती व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटेल समाज संतप्त आहे, रोजगार गमावल्यामुळे तरूणाई वैतागली आहे असा गुजरातचा ग्राऊंड रिपोर्ट होता. गुजरात म्हणजे आपलाच.. या अतिआत्मविश्वासाच्या आहारी गेलेल्या भाजपा नेतृत्त्वाने प्रारंभी या गोष्टी दुर्लक्षित केल्या होत्या. अतिआत्मविश्वास एवढा की विकासाचे तुणतुणे वाजवणाऱ्या भाजपाने शेवटपर्यंत गुजरात निवडणुकांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध केला नव्हता. मात्र याच मुद्द्यांवरून राहुल गांधी, हार्दिक पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांनी रान उठवले. भाजपाला खिंडीत पकडायला सुरुवात केली. तेव्हा भाजपाने या मुद्द्यांवरून गुजराती मतदारांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी प्रचाराऐवजी इतर गोष्टींचा अपप्रचार सुरू केला. खुद्द पंतप्रधान पदावरील व्यक्तीने पाकिस्तान कार्ड खेळले. देशाचे माजी पंतप्रधान, माजी लष्करप्रमुख, माजी उपराष्ट्रपती यांच्याविषयी संशयाचे ढग निर्माण केले, निखालास खोटे आरोप केले. धर्माच्या नावावर आणि पाकिस्तानची भीती घालून मतविभागणी होईल अशी पद्धतशीर आखणी केली. इतके करूनही भाजपाची गाडी १०० च्या पुढे जाऊ शकलेली नाही. जनतेने मोदींना मतदान केले आहे, असे म्हणत मोदींचा करिष्म्याला याचे श्रेय दिले जात आहे. भाजपाची घटलेली मते, गमावलेल्या जागा, काँग्रेसची मुसंडी हा मोदींचा करिष्मा असेल तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.


No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...