Thursday, 14 December 2017

लिहून देतो कर्जमाफी झाली आहे.., EDIT, Maharashtra Dinman, Farmers Karjmafi, CM, Assembly. Irrigaiton scam, Ajit Pawar

अग्रलेख
लिहून देतो कर्जमाफी झाली आहे..

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात ऐतिहासिक कर्जमाफी झाली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १०० रुपयांच्या नव्हे तर हजार रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून द्यायला तयार असताना काही नतद्रष्ट मंडळी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. फडणवीस यांनी सभागृहातही तेच सांगितले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याकडे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर ज्यांची कर्जमाफी झाली त्यांची नावे लिहून द्या, अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनीही आक्रमकपणे शंभर काय हजाराच्या स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असे आव्हान दिले. तरीही विश्वास दाखवायचा नाही म्हणजे कायहजाराची नोट तर मोदीसाहेबांनी कॅन्सल केली ना बे, मंग हजाराचा स्टॅम्पपेपर कुटून आणणारै भाऊ.. असेही अविश्वासू नतद्रष्ट मंडळींपैकी कुणीतरी पुटपुटल्याचं कानावर आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रामाणिकपणे कामाला लागलेले आणि बँकांना, आयटी खात्याला व सहकारी मंत्र्यांना कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरही ते आले असणार. पण त्यांनी विचलित होऊ नये. काही लाख शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करायचे, कर्जमाफी करायची, खचलेल्या बळीराजाला पुन्हा त्याच्या पायावर उभे करायचे, हिंमत द्यायची, त्यासाठी हेलिकॉप्टर डगमगले तरी स्वत: न डगमगता अविश्रांत दौरे करायचे, प्रत्येक ठिकाणी कर्जमाफीची माहिती द्यायची, आकडेवारी सांगायची हे येरागबाळ्याचे काम नोहे. आणि हे काम करत असताना जाहिराती देऊन केलेल्या कामाचे पुरावे जनतेसमोर सादर करायचे याला कुणी जाहिरातबाजी म्हणत असेल तर अशी माणसे करंटीच म्हणावी लागतील. सभागृहात खुद्द मुख्यमंत्री कर्जमाफी झाली आहे सांगतात तरी राज्याच्या या नेत्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही याला म्हणावे तरी काय? बुधवारी पुन्हा अजितदादांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. ३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही. जे उत्तर आहे ते इथे द्या”, अशी विचारणा त्यांनी फडणवीस यांना केली. आता या मंडळींना मामु फडणवीस यांनी सैराटमधील आर्चीचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवण्याची वेळ आली आहे. तोच तो मराठीत सांगितलेलं कळत नाही का.. डायलॉग. फडणवीस साहेब ऐकवाच या मंडळींना तुम्ही तो डायलॉग नाहीतर कर्जमाफी झाल्याबद्दल मंगळवारी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली  अशी जी जिल्हावार पत्रके सटासट प्रसार माध्यमांकडे पोहोचती झाली ती तरी त्यांच्या तोंडावर मारा. मगच, कर्जमाफीच्या वाटपाबाबत सरकारमध्येच एकवाक्यता नाही. सुभाष देशमुख एक सांगतात, चंद्रकांत पाटील दुसरंच बोलतात मुख्यमंत्री वेगळीच कोणतीतरी घोषणा करतात’, असे बोलणाऱ्या अजितदादांची बोलती बंद होईल. अद्याप शेतकऱ्य़ांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय’, असा आरोप करायला अजितदादा धजावतात तरी कसे? ज्या शेतकऱ्यांनी सरकारला कर्जमाफीबद्दल धन्यवाद दिल्याचे निवेदन केलेय ते दादांनी बहुदा वाचलेलं दिसत नाही. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री कर्जमाफीची आकडेवारी देताना परस्पर विरोधी माहिती देतात, असे दादा म्हणत असले तर त्यांना सिंचन घोटाळ्यातील आकडेवारीचीही आठवण करून द्यायला हवी. काही लाख कोटींची ही कर्जमाफी आहे. तपशील देताना चारपाचशे कोटी इकडेतिकडे होऊ शकतात. जनता हे समजून घेऊ शकते पण, राजकीय स्वार्थाने आंधळी झालेली विरोधी पक्षांतील नेतेमंडळी फडणवीस यांचा हे प्रामाणिक प्रयत्न समजून घेत नाहीत याचे वैषम्य कर्जमाफीबद्दल भाजपा सरकारला धन्यवाद देणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना वाटते आहे. कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे हे दिसत असतानाही नागपूरच्या थंडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळावर मोर्चा आणला. शरद पवारसाहेबांसारख्या जाणत्या राजाने सरकारशी असहकार करण्याची भाषा केली. धमक्या दिल्यात तर सरकार उलथवून टाकू... कर्जमाफी होईतो शेतकऱ्यांनी एकही वीज बील भरू नये, कर्जही फेडू नये असेही सांगितले. हा जनआक्रोश महामोर्चा विधानभवनाकडे सरकत असतानाच सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाले हा निव्वळ योगायोग आहे. ही धमकी किंवा ब्लॅकमेलींग नाही हे कुणीही सांगेल. आघाडी सरकारच्या काळातील कुणा मंत्र्यावर गुन्हा दाखल झाला असता तर एकवेळ ते सुडाचे राजकारण वा धमकीचे राजकारण म्हणता आले असते. कर्जमाफीवरून वारंवार सरकारला सतावले जाते, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते म्हणून गुन्हे दाखल करून गर्भीत इशारा दिला, असेही नाही. कर्जमाफीबाबत सरकारला काहीही लपवायचे नाही की विरोधकांचा आवाजही बंद करायचा नाही हे अवघा महाराष्ट्र जाणतो.

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...