मंत्रालयात नाराजी!
सरकारच्या कामगिरीवर
अधिकारी नाखूश
मुंबई (शैलेंद्र
शिर्के)
मी लाभार्थी.. म्हणत
सरकारच्या तीन वर्षांतील कामगिरीची जाहिरातबाजी सुरू असली तरी मंत्रालयातील
अधिकारी आणि कर्मचारीवर्ग मात्र भाजपा-शिवसेना सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. प्रत्येक
खात्याच्या कामगिरीचा अहवाल देण्याचे खातेनिहाय आदेश बुधवारीच सरकारने जाहीर केले
असले तरी, कामगिरीच नाही तर सांगायचे तरी काय, असा हताश सवाल खासगीत अधिकारीवर्ग
विचारत आहे.
मंत्रालयातील
खात्यांमध्ये डोकावून कानोसा घेतला असता सरकारच्या कामगिरीबद्दल संमिश्र मतप्रवाह
आढळतो. या सरकारने अपेक्षापूर्ती केली नाही असा बहुतांश सर्वसामान्यांमध्ये रोष
असताना, मंत्रालयातून सरकारची आणि प्रशासकीय यंत्रणेची सूत्रे हाकणाऱ्या
कर्मचारीवर्गानेही कमीअधिक प्रमाणात हाच अपेक्षाभंग व्यक्त करावा हे गंभीर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर सर्व सरकारची मदार आहे. ते
परिस्थिती निभावून नेण्यासाठी लढत असले तरी इतर मंत्र्यांची त्यांना पाहिजे तशी
साथ मिळत नाही, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारमध्ये असूनही
शिवसेनेचा विरोध, धुसफूस, कुरबुरी यामुळे भाजपा आणि फडणवीसही बेजार आहेत. दोन्ही
पक्षांकडून एकमेकांना चीत करण्याची वा अपमानित करण्याची, अडचणीत आणण्याची एकही
संधी सोडली जात नाही. या आघाडीवरही फडणवीस मुत्सद्दीपणा दाखवत असताना त्यांचे
भाजपातील सहकारी कुंपणावर बसून मजा घेत आहेत. शिवसेनेचे मंत्री फडणवीस यांना दबून
असले तरी कामगिरीत डावेच आहेत. महसूल, उद्योग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम ही तशी
जनतेशी दररोज संबंध येणारी खाती. या खात्यांकडे काम घेऊन येणारे लोक, व्यावसायिक,
उद्योजक यापैकी कुणीही नव्या सरकारकडून तीन वर्षांत मिळालेल्या प्रतिसादाबद्दल
फारसे समाधानी नाही.
कृषि खात्यातील
अधिकारीही सरकारच्या रिव्ह्यू आदेशांमुळे असमाधानी आहेत. पाटबंधारे, जलसिंचन
योजनांशी संबंधित अधिकारी, कर्मचारीवर्गही नाराज आहे. प्रकल्प जाहीर झाले पण तरतूद
केली गेली नाही, पैसेच दिले गेले नाहीत तर प्रकल्प उभारले कसे जाणार? आणि आम्ही आढावा तरी कुठल्या कामांचा देणार? असे त्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या या
बोलण्यावर निरुत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हीच उत्तरे मुख्यमंत्री कार्यालयाकडे
पाठवून द्यायचा निर्णय घेतला आहे, असे समजते.
अपेक्षाभंग आणि
असमाधानकारक कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित केल्यावर मागच्या सरकारकडे बोट
दाखवण्याच्या पळकाढू वृत्तीवरही मंत्रालयातील कर्मचारीवर्ग नाराज आहे. असे किती
दिवस चालणार? योजना, उपक्रमांसाठी पैसा
उपलब्ध करून अपेक्षाभंगाचा डाग धुवून काढता येईल, पण त्यासाठी पैसा हवा, असे सूचक
वक्तव्यही एका अधिकाऱ्याने केले.
No comments:
Post a Comment