अग्रलेख
‘संस्कार’भारती
‘दशक्रिया’, ‘पद्मावती’, ‘न्यूड’, ‘सेक्सी दुर्गा’... अशा सगळ्याच चित्रपटांबद्दल वेगवेगळ्या
कारणांवरून जो काही गदारोळ सुरू आहे त्याचे एका शब्दांत वर्णन करायचे झाले तर ‘बालभारती’ अशाच प्रकारे करावे
लागेल. बालिश चाळ्यांची परिसीमा या सगळ्या प्रकारांत गाठली गेली आहे. न्यूड,
सेक्सी दुर्गा चित्रपटांवर इफ्फी महोत्सवाच्या आधीच कुऱ्हाड चालण्याला दिल्लीतील ‘संस्कार’भारती जबाबदार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आरंभ करण्याचा मान मिळालेला चित्रपट निवड
समितीने मुक्रर केल्यावर अचानक महोत्सवातूनच वगळण्यात येतो, ते का, कशासाठी, मग
निवड समिती कशाला गोट्या खेळायला नेमली होती का?
कुठल्याच प्रश्नांची उत्तरे देण्याची तसदी दिल्लीतील ‘संस्कार’भारती घेत नाही. सेन्सॉर
सर्टीफिकेट नाहीय ना न्यूडला म्हणून काढला चित्रपट, असलं काहीतरी पुचाट उत्तर
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देतात. मुळात महोत्सवात सेन्सॉर
प्रमाणपत्राशिवाय चित्रपट दाखवले जाऊ शकतात, हेही पर्रिकर महाशयांना माहिती नाही. जे
न्यूडचे तेच सेक्सी दुर्गाचे. ज्यांचा चित्रपटांशी नाव लिहिण्यापलिकडे संबंध नाही,
ज्यांना चित्रपट समजण्याची वा हे एकूणच माध्यम समजून घेण्याची काडीइतकी अक्कल
नाही, कुवतही नाही ते दिल्लीच्या संस्कारभारतीतील रेमडोके नोकरशहा कुणातरी
संस्कारी बहुच्या सांगण्यावरून नंदीबैलासारखी मान डोलावत ‘न्यूड’ची अशी वासलात लावतात
तेव्हा ती फक्त चित्रपटाची अवहेलना नसते तर, चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच कॉलरला
धरून, धक्के मारत अपमानस्पद रितीने चित्रपट महोत्सवाच्या बाहेर काढल्यासारखीच ती
कृती असते. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या सुदैवाने बहुतांशी मराठी चित्रपटसृष्टी
त्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. निवड समितीचे अध्यक्ष आणि काही सदस्यांनी हा
चित्रपट वगळल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. मराठीतील काही नामवंत
दिग्दर्शक-निर्मात्यांनी चित्रपट महोत्सवावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
महोत्सवातून मराठी चित्रपट काढूनच घेऊ असाही एक सूर उमटला आहे. पण आज रवी जाधव तर
उद्या आणखी कुणी अशी सध्याची स्थिती आहे. चित्रपट पाहाण्याआधीच फक्त नावावरूनच
यांना करंट लागत असेल तर एकूणच चित्रपटसृष्टीचे कठीण आहे. तसे ते कठीण झाले आहेच.
कुठलाही चित्रपट येवो कुणाच्या ना कुणाच्या भावना दुखावल्या जातातच. मग चित्रपटात
तसे काही भावना दुखावण्यासारखे असो वा नसो. चित्रपट तथ्याला धरून असला तरी आणि
वास्तवाशी फारकत घेऊन कुठल्या कल्पित व्यक्तीरेखेची कहाणी सांगणारा असला तरीही
भावना या दुखावतातच. प्रसार माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून अशा दुखावलेल्या
मंडळींना जोरदार प्रसिद्धी मिळत असल्यामुळे बतावण्या, निषेधाचे सूर आणि धमक्यांना
उत येतो. दशक्रिया हा एक उत्तम सिनेमा आणि पद्मावती हा चित्रपट सध्या अशा भावना
दुखावलेल्यांचे लक्ष्य बनला आहे. दशक्रिया ही बाबा भांड यांची गाजलेली कादंबरी. या
कादंबरीवरून संदीप पाटील या तरूण दिग्दर्शकाने मेहनतीने चित्रपट बनवला आहे. या
चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. कुठल्याही समाजाची यात बदनामी नाही.
चित्रपट सेन्सॉरसंमत आहे. तरीही अचानक अपशकून करायला काही मंडळी उभी राहातात, एका
चांगल्या चित्रपटाची वाट अडवतात तेव्हा वाईट वाटतं, असे चित्रपटाचे कार्यकारी
निर्माते राम कोंडीलकर तळमळीने सांगत होते. चित्रपट आधी पाहा तरी मग व्यक्त व्हा,
हे त्यांचे आवाहन कुणी मनावर घ्यायला तयार नाही. तीच परिस्थिती पद्मावती
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांची. राणी पद्मावती इतिहासात खरोखरीच
होती की नव्हती याचे काहीही पुरावे नाहीत. ती एक आख्यायिका आहे. भन्साली यांनी या
आख्यायिकेशी निगडीत ऐकीव माहितीवर चित्रपट बेतला आहे. पण इतिहासात नसलेल्या
पद्मावतीला वास्तवात आणण्यासाठी राजपूत करणी सेना नावाची संघटना चित्रपटाविरोधात
उभी ठाकली आहे. उभी ठाकली कसली त्यांनी तर थेट धर्मवेड्या कट्टरपंथीयांची भाषा
सुरू केली आहे. भन्सालीचे मुंडके उडवणाऱ्याला पाच कोटी आणि दीपिकाचे नाक
कापणाऱ्याला दोन कोटी देण्याच्या घोषणा केल्या आहेत. सॅटानिक व्हर्सेसनंतर सल्मान
रश्दी यांच्या हत्येसाठीही असाच फतवा जाहीर करण्यात आला होता. रश्दी यांना कितीएक
वर्षे दडपणाखाली काढावी लागली होती. राजपूत करणी सेनेची करणीही याच प्रकारातील
आहे. चित्रपट काढला म्हणून भावना दुखावल्याचा गहजब करणारे एखाद्या व्यक्तीच्या
शिरच्छेदासाठी बक्षिस जाहीर करत हत्येला, हिंसेला, शारीरिक इजेला चिथावणी देत
असताना दिल्लीतील ‘संस्कार’भारती मौन धारण करून आहे. हिंदू
धर्माची विशालता, सहृदयता, समजूतदारपणा, उदारमतवाद याचे कणभरही प्रतिबिंब या
संकुचितपणात दिसत नाही. हे थांबणारे अरिष्ट नाही. चित्रपट, गाणी, पुस्तकं, लिखाण,
चित्रे, नाटक कशानेही भावना दुखावू शकतात. त्यापेक्षा सगळेच बंद करून
प्रतिभावंतांनी देशोधडीला लागावे हेच बरे!
No comments:
Post a Comment