Tuesday 14 November 2017

पाळेमुळे सोडवून उठून जाताना...

अग्रलेख

गावखेड्यात, तिथल्या मातीत रुजलेली आपली पाळेमुळे सोडवून आयुष्याची संध्याकाळी दुसरी वाट धरायची, जिथे जन्मलो, वाढलो तिथून उठून जायचे नाईलाजाने... कसे वाटत असेल म्हाताऱ्या जीवांना? दोन दिवसांपूर्वी आमचे स्नेही आणि ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांनी फेसबुकवरील एका पोस्टमधून हा विषय खूप आतून मांडला. त्यांच्या आईला आणायला ते गावी गेले होते. आणि त्यांना जाणवलं ते त्यांनी फेसबुकवर व्यक्त केलं. काय जाणवलं त्यांना.. वार्धक्याकडे झुकलेल्या आईची व्यथा, नाईलाजाने गाव सोडायची वेळ आल्यामुळे डोळ्यांत आलेले अश्रू आणि त्याचबरोबर त्यांच्या आईंसारख्याच अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मूक आक्रंदन. विकास महाडिक त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात – काल कोकणात गेलो होतो. आईला आणायला. 12 दिवसांपूर्वी ती गावी गेली होती. पण तिला आता कोकणात करमत नाही. कारण एकच कोकणातील घरं आता ओस पडायला लागली आहेत. अतिशय गंभीर बाब आहे. जी बाई 22 वर्षांपूर्वी हट्टाने गावी गेली. मुलांकडून घर बांधून घेतलं. तिला आता घर खायला उठतं. कारण गावात घरं आहेत पण त्यात राहायला माणसं नाहीत. सर्व सुविधा आहेत पण तिचा वापर करायला हात नाहीत. कोकणातील प्रत्येक गावात आलिशान घरे आणि मंदिरे दिसतील. पण घरांना कुलपं लटकलेली असतात. काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेले चाकरमानी आता कोकणात जायला मागत नाहीत. जी गेली आहेत ती बोटावर मोजण्याइतकी. ती काय स्वमर्जीने गेलेली नाहीत. प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी ट्रॅजेडी झालीय म्हणून. कोणाची पत्नी गेली म्हणून तर कोणाची मुले सांभाळत नाहीत म्हणून. चाकरमान्यांची तिसरी-चौथी पिढी आता मुंबईत आहे. पोराबाळांच्या शिक्षणासाठी वसई, विरार, कर्जत, पनवेलला राहून दिवस काढतायेत. नोकरीसाठी पाचसहा तासांचा प्रवास करत आहेत. पण गावी जायचं नाव घेत नाहीत. गेलेच तर संध्याकाळी बेधुंद होऊन गाव फिरत राहतात. वर्षातून दोन वेळा मात्र न चुकता हा कोकणस्थ गावाकडे जातो. एक गणपती आणि दुसरी होळी. हे दोन दिवस कोकणातील 90 टक्के घरे उघडी दिसतात. ह्या दिवसात उणीदुणी आणि पार्ट्या यांना जास्त महत्व असते. घर उघडी राहणे वर्षभर होत नाही. बोलायला माणूस नाही म्हणून वय झालेली माणसं देखील इच्छा नसताना मुंबईत पळत आहेत. कोण थांबवणार ह्यांना? कोकणातील नेत्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या. कोणी शेठ झाले तर कोणी राव. पण कोकणात राहावे असे वातावरण निर्माण झाले नाही. एक चांगले हॉस्पिटल कोकणात नाही की चांगल्या रस्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईत दररोज आदळणाऱ्या लोकसंख्येच्या लोंढ्याची आपल्याला चिंता. इथे कोकण ओस पडतंय ह्याचा कोणी विचार करायचा? बघा जमतंय का विचार करून..” महाडिकांनी त्यांच्या आईच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठांच्या अंतरीची सल मांडली आहे. वर्षभर उघडी असणारी घरे आता दोनपाचच राहिली आहेत हे खरं आहे. महाडिकांचेच गाव नव्हे तर कोकणातील अनेक गावे या कुलुपबंद घरांची राखण करत असतात. गणपती, शिमग्याला कुलूप उघडले जाते, घर गजबजते, एरव्ही जळमटं धरलेल्या भिंती आनंदतात. कोकणातच कशाला राज्याच्या अनेक भागांतील गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. देशातील अनेक खेड्यापाड्यांत कमीअधिक फरकाने हीच अवस्था आहे. हे एक अस्वस्थ करणारे स्थलांतर सुरू आहे... पाळमुळं तोडून निघतायत माणसं.. न झेपणाऱ्या वयात. विकासने मांडलेले निरीक्षण अस्वस्थ करू लागले तसा त्याला फोन लावला. तो परतीच्या वाटेवरच होता. कशाला राहातील माणसं गावांत? ना रस्ते ना कुणी आजारी पडले तर त्याला योग्य उपचार मिळायला दर्जेदार वैद्यकीय सेवा.. तो तळमळीने बोलत होता. काहीतरी करायला हवे, कोकणातल्या माणसाचा पाय गावातच ठरायला हवा, असे बोलणे झाले. पण जी पिढी पोटासाठी गाव सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली आहे ती मागच्यांना कुठल्या तोंडाने गावातच राहा म्हणून सांगणार? प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे आणि जगण्यासाठी दिशा शोधण्याचा हक्क आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं भरडली जात आहेत त्याचंच हे दृश्यरुप. कोकणातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांत निमूट उभी असलेली बंद घरे काय सांगतात? ती घरे सांगतात, गाव, तालुका पातळीवर रोजगाराची गरज, शेती-शेतकरी जगवण्याची गरज, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची गरज, भारताचा कणा असलेल्या कृषिव्यवस्थेशी निगडीत पूरक व्यवसाय, जोडधंदे तगवण्याची गरज. चांगल्या रस्त्यांची गरज. कारण रस्ते चांगले तर विकासवाटा या रस्त्यांवरून गावांत पोहोचतील आणि गावे जगतील नव्हे पुन्हा एकदा जागतील.

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...