अग्रलेख
नागपूरचे राजकीय
हवामान
विधिमंडळाचे नागपूर
अधिवेशन म्हटले कि सरकारला आणि विरोधी पक्षांनाही जोर येतो. बातम्यांच्या मागे
असलेल्या पत्रकारांना तर काय करू आणि काय नको असे होऊन जाते. नागपूर अधिवेशन
म्हणजे हिवाळी सहल असाच बऱ्याचजणांचा समज झालेला असतो. ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात
जे नागपूर असे नावही जिभेवर आणत नाहीत त्यांना तिथली गुलाबी थंडी, गरम उबदार
सोयीसुविधा, पाहुणचार, अवतीभवतीच्या सहली, व्याघ्रमंडळींशी नजरभेट असे काय काय
खुणावू लागते, आमंत्रित करते आणि हिवाळी अधिवेशनाची टूर नागपूरला निघते. त्या
कडाक्याच्या थंडीत आमची पत्रकार मंडळी इमानइतबारे बातम्या संकलित करत असतात, पाठवत
असतात. गेली काही वर्षे तर विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष अशा दोघांनीही पत्रकारांना
बातम्या देण्याची, पुरवण्याची जबाबदारी जणू अहमहमिकेने वाटून घेतली आहे. कुणालाच
काही कमी पडू नये यासाठी उभय पक्षांकडून रसद पुरवली जात असते. पत्रकारांना कामाला
लावण्याची किंवा त्यांना काम पुरवण्याची सुरुवात सरकार आणि विरोधक हे दोघेही
चहापानाच्या कार्यक्रमापासून करतात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापान
आयोजित करायचे आणि त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, ज्येष्ठांनी यायचे,
नागपूरच्या थंडीत झटक्यात गार होणारा चहा चपळाईने पहिली वाफ विरण्याच्या आधीच
तोंडाला लावायचा, एखादे मारी बिस्कुट वा वेफरचा तुकडा हसतखेळत, परस्पर सहकार्याने तीळासारखा
वाटून खायचा ही चहापानामागील उच्च भावना आणि आजवरची परंपरा. पण गेली काही वर्षे या
परंपरेला दृष्ट लागली आहे. चहापानाला काही विरोधी पक्ष फिरकायला तयार नाहीत.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ही बातमी तरी किती वर्षे द्यायची पत्रकारांनी? म्हणून मग सरकारचे चहापान, मुख्यमंत्र्यांचा
आरोपांचा इन्कार, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार या बातम्यांबरोबरच पत्रकार
परिषदांच्या बातम्या सुरू झाल्या. सरकारची पक्षी मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार
परिषद आणि तिकडे बहिष्कारवादी पक्षी विरोधी पक्षनेत्यांची एक पत्रकार परिषद.
पत्रकारांची कोण धावपळ. नागपूरच्या थंडीत घाम येत नाही म्हणून बरे. इकडे
मुख्यमंत्री बोलणार ते टिपायचे आणि तिकडे विरोधी नेत्यांच्या पत्रकार परिषदेकडे
वळायचे. आता विरोधी नेतेही दोन नाही तर प्रत्येक पक्षागणिक. ज्येष्ठ नेते वेगळे.
या प्रत्येकालाच पत्रकारांना बातमी द्यायची कोण तळमळ असते. तर असे सगळे
नागपूरमुक्कामी सुरू असते. कालच्या रविवारीही तेच झाले. चहापानावर नव्या
परंपरेनुसार बहिष्काराची प्रथा विरोधकांनी पाळली. तिकडे विरोधक येणार नाहीत या
खात्रीने सरकारने आधीच बचत म्हणून चहा कमीच सांगितला होता. बिस्कीटाचे पुडेही
दोन-पाच कमीच आणायला सांगितले होते म्हणतात. विरोधकांनी त्यांचे स्वतंत्र चहापान
केले आणि पत्रकार परिषदेत माईक हातात घेतले. किती जबरदस्त घोषणा विरोधी नेत्यांनी
दिल्या आहेत. प्रत्येकाची कडक मथळ्याची बातमी होईल असा रसदपुरवठा. विधान परिषदेतील
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे काय बोलले बघा - जसा गुजरातमध्ये विकास वेडा झाला
आहे तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे.. हांगाश्शी. ते बोलल्यावर
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील कसे गप्प बसणार?
त्यांनीही तोफ
डागली. बीटी बियाणे दिले म्हणतात त्यातले बी म्हणजे भाजपा आणि टी म्हणजे ठाकरे. या
सरकारचे हे दोनच लाभार्थी आहेत, भाजपा आणि ठाकरे. ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले
नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे, असे
विखेपाटील बोलले. न झालेली कर्जमाफी, जाहिरातबाजीपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
घोटाळे, भ्रष्टाचार असा काय काय दारूगोळा विरोधकांनी गोळा केला आहे. हे नव्हं माझं
सरकार... या घोषणेसह अनेक चमकदार घोषणांचे फलक तयार आहेत. हल्लाबोल नव्हे यांची
यात्रा म्हणजे डल्ला मार, असे सांगत तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही
दंडबैठका सुरू केल्या आहेत. मंगळवारी नागपूरचे हवामान तप्त असेल कारण, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे दोन
मोर्चे सरकारवर हल्लाबोल करणार आहेत. स्वतंत्रपणे निघून या मोर्चांचा मुळा-मुठा
नद्यांप्रमाणे संगम होणार आहे. एकूणच नागपूरची हिवाळी हवा राजकीय आतिषबाजीने
तापवली जाणार आहे, असे कुणालाही रविवारी विरोधी पक्षनेत्यांची देहबोली पाहून वाटावे.
पण प्रश्न असा आहे की, पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमकपणे सरकारचे वाभाडे काढणारे
विरोधक अधिवेशनात एकी कायम ठेवून सरकारला घेरणार का?
पूर्वानुभव विचारात घेता याचे उत्तर ठामपणे होकारार्थी देता येत नाही म्हणूनच
जनतेमधील असंतोषाचे पडसाद या प्रतिनिधींकडून सभागृहांत पोहोचतात की पायऱ्यांवरच
विरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरावे.
No comments:
Post a Comment