अग्रलेख
श्वापदे जमली
सारी...
नकोशा घटनांपासून,
बातम्यांपासून संवेदनशील मनांनी जितके दूर व्हायला पाहावे तितक्या या घटना एखाद्या
हिंस्त्र श्वापदासारख्या अंगावर धावून येत असतात. दररोज सकाळी वृत्तपत्र उघडले की
अशाच स्वरुपाच्या बातम्या भेसूर कोलाहल करत नजरेसमोर थयथयाट करू लागतात. कुठे आई रागावली
म्हणून मुलाने सुरी खूपसुन आत्महत्या केलेली असते तर कुठे १५ वर्षांच्या मुलानेच
जन्मदात्या आईला आणि बहिणीला बॅट आणि सुऱ्याचे घाव घालून संपवलेले असते. भिवंडीत
कुठेतरी दीड वर्षांच्या अबोध बालिकेवर अत्याचार करणारा विकृत मोकाट फिरत असतो तर,
हिस्सारजवळ अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर निर्घृण अत्याचार करून तिची
निर्भयासारखीच अमानूष वाट लावण्यात आलेली असते. एक दिवसही असा जात नाही की या
बातम्या तुम्हाला सुन्न करत नाहीत. वाचकांआधी अशा बातम्या वर्तमानपत्रांत काम
करणाऱ्या पत्रकारांची मने सुन्न करत असतात. त्यांचा जीव घायकुतीला आणत असतात.
त्यांच्या घरी असलेल्या कच्च्याबच्च्यांच्या काळजीने, नुकत्याच वयात येणाऱ्या वा
दुडुदुडु रांगणाऱ्या चिमुकलीच्या काळजीने त्यांचा जीव काट्यावर टोचलेल्या
फुलपाखरागत फडफडू लागतो. कालांतराने मन निबर व्हायला लागते, डोळे अशा बातम्यांना
सरावतात पण अत्याचार, हिंस्त्रता, अमानूष क्रौर्य आतून हलवतेच. सावित्रीच्या लेकी
म्हणायच्या आणि त्याच छोट्याशा मुलींना वर्गात नेऊन विवस्त्र करून मोबाईलवरील
अश्लील छायाचित्रे दाखवायची अशा कामांध मुख्याध्यापकाची इयत्ताच मग कळेनाशी होते.
लखनौला रक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीवर तिघांनी बलात्कार केला म्हणून तिने आणखी
एकाकडे मदतीची याचना केली तर त्यानेही तिची उरलीसुरली लक्तरे फेडली या घटनांना
म्हणायचे तरी काय? जिच्यावर जिवापाड प्रेम
केले तिचीच मान छाटून टाकायची, तिच्यावर चेहरा, कातडी जाळणारे दाहक आम्ल फेकायचे,
तिच्या देहाचे तुकडे तुकडे करायचे, खाटकासारखे घाव घालून एक जीव संपवून टाकायचा हे
समाजात काय चालले आहे तेच कधी कधी कळेनासे होते. गुन्हेगारीचा आलेख महाराष्ट्रात
कधीचाच वाढला आहे. पण चिंताजनक आहे ते बलात्कार, अत्याचारांचे प्रमाण. भयकंपित
होणारी आकडेवारी आहे ती लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांची, त्यांच्या शोषणाची.
महिलांचे विनयभंग तर आता रोजचीच गोष्ट झाली आहे. दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या
विमानात झायरा वसिमने या गोष्टीचा वाईट अनुभव शनिवारी रात्री घेतला. त्याची बातमी
झाली. पण असे कितीतरी विनयभंग दररोज शेकडो महिला मुकाटपणे सहन करत असतात. शब्दही
उच्चारत नाहीत, अरे ला कारे करायला धजावत नाहीत. त्यांचे काय? ग्रामीण भागातच नव्हे शहरांतही ज्यांची रोज छेडछाड
होते त्या मुलींना संरक्षण कोण देणार? कालचीच बातमी होती.
घनसावंगीमध्ये अशाच छेडछाडीला कंटाळून दहावीतील एका मुलीने गळफास लावून घेतला.
गावातलाच कुणी तरी तिच्या मागे लागायचा, हात धरायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा.
अखेर तिनेच गळफास लावून घेत जीव संपवला. तो हरामखोर आता फरारी झाला आहे. कुणाला
जाब विचारायचा तिच्या शोकाकूल आईवडिलांनी. घरात झोपलेले तान्हे लेकरूही आता मानवी
बुरखा पांघरून वावरणाऱ्या लांडग्यांपासून सुरक्षित राहिलेले नाही. हिस्सारला आईजवळ
झोपलेली पाच वर्षांची लहानगी त्या नराधमाने उचलून नेली, तिच्यावर अत्याचार केला
आणि निर्भयासारखीच तिची अवस्था करून तिला ठार केले. डोळ्यांत रक्त उतरावे,
मस्तकीची शिर ताडताड उडावी अशा या घटना. वडवणी तालुक्यातील ढोरवाडीच्या जिल्हा
परिषद शाळेतील मुख्याध्यापक म्हणवणारा तो विकृत. तिसरी-चौथीतील चिमुरड्या मुलींना
बंद वर्गात नेऊन बाकांना सुतळीने बांधून त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. मोबाईलवरील
अश्लील फोटो दाखवायचा. घरी सांगू नये म्हणून या लहान्यांना धमकी द्यायचा. भिवंडीत
तेच, डोंबिवलीत तेच आणि वडवणीतही तेच. जे दिल्लीत तेच गल्लीत. जणू श्वापदांच्या
टोळ्या सैराट फिरताहेत. एकीकडे कामपिसाट जनावरे आणि दुसरीकडे ताळतंत्र सोडलेले,
नात्यांमधील ओलावाही हरवून बसलेली कुमारवयीन मुले. कुठल्याही कारणावरून हाणामारी.
घरी संताप. आईवडील बोलले म्हणून आत्महत्या. नाहीतर आईवरच हल्ला, घरच्यांचीच अत्यंत
थंडपणे हत्या. गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाविषयी लिहितांना मागे म्हटले होते तेच
खरे आहे. सारे हाताबाहेर जात चालले आहे. याची सामाजिक कारणे शोधण्याची वेळही निघून
गेली आहे. अशा हिंस्त्र, क्रूर, अमानूष जनावरांना आता वय न पाहाता, दयामाया न
दाखवता कठोरात कठोर शासनच व्हायला हवे. समाजाला वेठीस धरू पाहाणाऱ्या श्वापदांसाठी
पिंजरे, बंदुकीची गोळी, देहदंड हेच योग्य ठरते. श्वापदांचा जमाव दिवसाढवळ्या आता
नख्या परजून बाहेर पडू लागला आहे. समाजाने संवेदनशीलता थोडीशी बाजूला ठेवूनच या
संकटाचा सामना करायला हवा.
No comments:
Post a Comment