Saturday 3 November 2018

दिवाळी आणि दिवाळे

काही वर्षांपासून आपल्याकडे ऑनलाईन शॉपिंगचा जणू चस्का लागल्यासारखे झाले आहे. कुठूनही कुठेही घरबसल्या खरेदी आणि वस्तू जगाच्या पाठीवर घरपोच ही तर या सुविधेची सर्वाधिक आकर्षणाची बाब. भारतातील गाव, तालुके, शहरे, महानगरे सर्वत्रच हे वेड झपाट्याने फोफावत गेले आणि तितक्याच वेगाने पारंपरिक पद्धतीने व्यवसाय, विक्री, उद्योग करणार्‍या आपल्या अवतीभवतीच्या दुकानदारांचा व्यवसाय कमी होत गेला. ही स्पर्धा आता तर विषम झाली आहे. मोठमोठ्या ब्रँड्सची दुकाने आहेत पण लोक हेच ब्रँड वेबसाईटवरून सवलतीत खरेदी करतात आणि चकचकीत शोरूम ग्राहकांची वाट पाहात राहातात. बंपर सेल, दिवाळी स्पेशल, इंडियाज मूड अशा विविध कॅची टॅगलाईनखाली सध्या ई-कॉमर्स क्षेत्राने आपला व्यवसाय वाढवला आहे. या आकर्षक सवलतींच्या मार्‍याला ग्राहकही बळी पडतात. ब्रॅण्डेड वस्तू कमी किंमतीत मिळत असल्याने या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर तुफान गर्दी होते. याचा फटका मात्र स्थानिक आणि छोट्या व्यापार्‍यांना बसला आहे. घरबसल्या शॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात दुकानांमध्ये म्हणावी तशी गर्दी अद्याप दिसलेली नाही. छोटे मोठे दुकानदार, स्टॉलधारक यांच्या व्यवसायावरच जणू कुर्हाड आली आहे. आजघडीला देशात सुमारे सात कोटींहून अधिक किरकोळ व्यापारी आहेत. यापैकी बहुतांश व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू विकतात. तर एक मोठा टक्का हा इलेक्ट्रॉनिक आणि कापड क्षेत्राशी संबंधित आहे. या व्यापार्यांच्या दृष्टीने रक्षाबंधन ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा आणि तेथून पुढे उन्हाळ्यातील लग्नसराईचा मोसम व्यापारासाठी अनुकूल समजला जातो. पण, ऑनलाइन कंपन्यांनी त्यांचा धंदा बारा महिन्यांसाठी खाल्ला आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर एक संदेश प्रचंड व्हायरल झाला होता. विदेशी कंपन्यांकडून खरेदी करून भारतातला पैसा परदेशी पाठवण्यापेक्षा स्थानिक व्यापार्‍यांकडूनच खरेदी करण्याचं आवाहन या संदेशात होते. मात्र तरीही ऑनलाईन शॉपिंगचा पगडा कमी झालेला नाही. हल्ली कपड्यांपासून ते अगदी घरातील वाणसामानापर्यंत सारंकाही एका क्लिकवर घरपोच होते, तेही तुलनेने कमी किंमतीत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट काढत, घाम पुसत, गर्दीत धक्के खात खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या असा ऑनलाईन शॉपिंगचा पर्यायच निवडला जातो. मात्र हा ट्रेंड काही पारंपरिक व्यवसाय करणार्या व्यापार्यांच्याच मुळावरच आला आहे. ऐन दिवाळीत त्यांची दिवाळं निघण्याची वेळ आली आहे. सणांच्या काळात करोडोंची उलाढाल करणार्या उल्हासनगरातील व्यापारीही डोक्याला हात लावून बसले आहेत. रस्त्यांवर पसरलेला शुकशुकाट डिजिटल क्रांतीची जाणीव करून देत असला तरीही ही क्रांती मात्र लहान व्यापारांसाठी दिवाळी नव्हे दिवाळं काढणारी ठरली आहे. हाच उरला सुरला व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ येऊ नये याकरता उल्हासनगरातील व्यापारांनी एकत्र येत चाणक्यनिती आखली. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून वस्तू खरेदी करायच्या. खरेदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय वापरायचा. वस्तूची डिलिव्हरी आल्यावर ती डिलिव्हरी नाकारायची. माल सतत परत गेल्याने मग त्या पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय बंद करण्यात येतो. ही शक्कल उल्हासनगरातील अनेक व्यापार्‍यांनी वापरली. परिणामी अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांनी उल्हासनगर पिनकोडसाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्यायच बंद केला. कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायामुळेच ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात केले जाते.  हा पर्याय बंद पाडण्याची नामी शक्कल उल्हासनगरातील व्यापार्‍यांनी लढवली खरी पण त्याचबरोबर ग्राहकांच्या अधिकारांवरही त्यांनी आक्रमण केले आहे. ग्राहक त्यांना पाहिजे त्या पर्यायाने, पाहिजे त्या सुविधेनुसार, घरातून, बाजारात जावून खरेदी करू शकतात. त्यांचा ऑनलाईन खरेदीचा पर्याय बंद केला असल्यास या व्यापार्‍यांनी ग्राहकांना खरेदीचे चांगले पर्याय, सवलती, चांगली उत्पादने स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध करून द्यायला हवीत. ग्राहकांशी चांगले वागायला हवे. पसंत नसलेला वा खराब, दर्जाहीन निघालेला माल बदलून द्यायला हवा. तरच बाजारपेठा पुन्हा गजबजू शकतात हे दुकानदार, व्यापारी यांनीही ध्यानात घ्यायला हवे. जमाना आता ऑनलाईनचा आहे. ग्राहक राजा आहे. त्याच्याशी अरेरावीची वर्तणूक यापुढे चालणार नाही हे उमजून सर्वच शहरांमधील व्यापारी, दुकानदार वर्गाने त्यांची व्यवहाराची, वागण्याची पद्धतही बदलावी. तरच ग्राहक दुकानांची पायरी कदाचित पुन्हा चढतील. ठाणे, मुंबई व अन्य शहरांतही हीच परिस्थिती आहे. एक विचित्र परिस्थिती या नव्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमुळे एक लाखभर तरुणांना नोकर्या लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तेव्हाच स्थानिक दुकानांमधून कर्मचारी कपात करण्यात आली. हे चित्र बदलायचे असेल तर दुकानदारांनाही त्यांच्या व्यवसायाचा फेरविचार करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...