Saturday 3 November 2018

वसईचे जीवघेणे पाणी!


वसई-विरार शहरासाठी पाणी हा विषय नेहमीच ज्वलंत राहिला आहे. शहराचा विकास (?) झपाट्याने झाला तरी शहर आजही पाणीटंचाईला तोंड देत आहे. 2009मध्ये महापालिका अस्तित्वात आली. पण तिलाही या समस्येवर मात्रा सापडलेली नाही. आता सूर्या प्रकल्प योजनेचा तिसरा टप्पा दृष्टिक्षेपात आहे. सूर्या, उसगाव, पेल्हार या धरणांतून अमुक इतके पाणी शहराला मिळेल, असे आश्वासन पालिका देत असली तरी जनता पाणी हंड्यात मोजते. हे पाणी जेव्हा खर्‍या अर्थाने हंड्यात येईल... तेव्हाच ही समस्या सुटली म्हणायची. ( 20 एप्रिल 2016 च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीच्या हवाल्यानुसार महापालिकेने जूनपर्यंत नागरी भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन दिले होते.)पण अद्याप या जलवाहिन्या आलेल्या नाहीत. त्या येण्याआधी निवडणुका येतील... त्या जिंकायच्या म्हणजे हेच पाणी सत्ताधारी पेट्रोलसारखे पेटवतील आणि त्यावर निवडून येतील. तोपर्यंत या शहराला टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे. आणि तोपर्यंत टँकर आणि पाणी येथील नागरिकांचे जीव घेतच राहणार आहेत.
वसई-विरार शहरातील कित्येक भाग आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. ग्लोबलसिटीसारखी आलिशान वसाहतही आपली तहान टँकरच्या पाण्यावरच भागवते आहे. वसई पूर्व, नालासोपारा पूर्व, विरार पूर्व आणि अन्य काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा होताना दिसतो. बेकायदा बांधकामांनी नैसर्गिक जलस्रोतांचा घोटलेला गळा, बेकायदा इमारतींसाठी होत असलेला बेफाम पाणीउपसा आणि जागोजागी मारल्या गेलेल्या बोअरवेल ही कारणे पाणीटंचाईसाठी कारणीभूत असली तरी वसई-विरार महापालिकेचे नसलेले नियोजन आणि त्यामागे असलेले राजकारणही या पाणीटंचाईला कारणीभूत आहे.
साहजिकच दिवसभर शहरातील अनेक रस्त्यांवर टँकर धावताना दिसतात. या टँकरनी रस्त्यांची वाट तर लावली आहेच, पण आता भरवस्तीतून धावणारे हे टँकर नागरिकांचाही जीव घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी वसईत एका तरुणाचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. परिणामी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. गणेशोत्सवादरम्यान गणेश आगमनादिवशीच नालासोपार्‍यातही मिरवणुकीदरम्यान, एका व्यक्तीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या वेळीही मिरवणुकीत सहभागी लोकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला होता. या लोकांना हटवण्यासाठी मग पोलिसी बळाचा वापर केला गेला, पण टँकरविरोधी कारवाईसाठी कोणतीही पावले उचलली गेलेली दिसली नाहीत.
त्या आधी परदेशातून विरार येथील ग्लोबलसिटी येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेली तरुणी स्कुटीवरून जात असताना तिला टँकरने धडक दिली होती. या अपघातात या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. त्यापूर्वीही एका चिमुरड्याला नालासोपारा येथे एका टँकरने चिरडले होते. तर चंदनसार येथे एका दुचाकीला टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या झाल्या या वर्षातील अलीकडच्या घटना... पण वर्षानुवर्षे या शहराला असलेली टँकरची साडेसाती आजही संपलेली नाही. अशा अनेक घटना या आधीही घडल्या आहेत. दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री वर्दळीच्या आणि भररस्त्यांतून, तर कधी चिंचोळ्या रस्त्यांवरून धावणारे टँकर राक्षसांसारखे वाटतात. शाळांतून सुटलेल्या विद्यार्थ्यांचे, रस्ता ओलांडणार्या पादचार्यांचे, तर कधी अबालवृद्धांना आपल्या जबड्यात घेतील की काय? असे भयाण आवाज करत धावतात. दुर्दैव म्हणजे अशा घटना घडत असताना कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यातील कित्येक टँकर हे मोडीत व भंगारात निघालेले आहेत.पण ना त्यांच्याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष, ना आरटीओचे!
मागील काही वर्षांत वसई-विरारची लोकसंख्या झपाट्याने वाढली. वसई-विरार शहराच्या 383 किलोमीटरच्या परिसरात आजघडीला तब्बल 13 लाख लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येत दिवसागणीक वाढच होत आहे. परिणामी महाराष्ट्रातील पाचवे मोठे शहर म्हणूनही वसई-विरार शहर उदयास येत आहे. त्या तुलनेत वसई-विरार महापालिका या शहराला मूलभूत सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे.
वसई-विरार शहराचा तथाकथित विकास (?) झाला तरी अद्याप हे शहर पाणीटंचाईला तोंड देत आहे. शहरात झालेली बेफाम अनधिकृत बांधकामे आजही पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेतच, पण अधिकृत म्हणवल्या जाणार्या इमारतीही याच पाण्याच्या घोटावर जीवन ढकलत आहेत. काही इमारती अनधिकृत असल्याने त्यांना अद्याप महापालिकेकडून पाण्याची कनेक्शन मिळालेली नाहीत. याचाच परिणाम जागोजागी पाणी विक्री करणारी दुकाने वाढली. बेकायदा पाणी विकण्याचा धंदा वाढला. काही इमारती कायमच टँकरवरच अवलंबून राहिल्या. ही वाढती पाणीटंचाई टँकर लॉबी आणि पाणी विक्रेत्यांच्या पथ्यावरच पडली. उन्हाळ्यात तर ही लॉबी चढ्या किमतीने पाणी विक्री करून नागरिकांची लूट करते. विशेष म्हणजे महापालिकेकडू होणारा पाणीपुरवठा काही भागात जास्त, तर काही भागांत कमी होत असल्याने ज्या ठिकाणी पाणी येते, त्या नळांवर झुंबड उडालेली दिसते. या जीवघेण्या कसरतीत लोकच पाण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठताना दिसतात. 30 जून 2015 रोजी टँकरच्या पाण्यावरून वालीव येथे दोन गट एकमेकांना भिडले होते. यातील सात जणांना पोलिसांनी अटकही केली होती.(संदर्भ : फ्री प्रेस जर्नल)वालीव येथील औद्योगिक परिसरात अफाट बेकायदा बांधकामे झालेली आहेत. ही सर्व बांधकामे टँकरवरच पाण्यासाठी अवलंबून असलेली दिसतात. परिणामी या ठिकाणी हाणामारीच्या घटना रोजच होत असतात. महिलांचा तर दिवस पाणी भरण्यात आणि पाण्याची वाट पाहण्यातच जातो.
दुसरीकडे महापालिका टँकर लॉबीवर नियंत्रण मिळवण्यातही अपयशी ठरली आहे. टँकरमधून येणारे पाणी नेमके येते कुठून? याचाही कुणाला ठावठिकाणा घ्यावासा वाटत नाही. दोन वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही टँकर जवळपासच्याच खदानींतून पाणी भरताना दिसले होते. तर काही टँकर महापालिकेचीच जलवाहिनी फोडून पाणी भरताना आढळले होते. त्यानंतरही महापालिकेने याविरोधात कडक कारवाई केलेली दिसली नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने आवाज उठवलेला दिसला नाही.कारण या पाण्यात सगळ्यांचेच हात ओले होत असल्याने आणि नागरिकांचाही तहानेने गळा सुकल्याने असा आवाज उठणे शक्यच नव्हते. तर महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने आपले कान बंद करून घेतल्याने आवाज उठला तरी त्यांच्यापर्यंत तो गेलाच नसता. याचाच अर्थ वसई-विरारचे टँकर आणि पाणी भविष्यातही अनेक जणांचे प्राण घेणार हे नक्की आहे.

No comments:

Post a Comment

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...